उम्फुन वादळानं आता उग्र रूप धारण केलं असून ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात पोचलं आहे. येत्या दोन दिवसांत ते पश्चिम बंगाल मधल्या दिघा आणि सुंदरबन भागातून पार होईल. यावेळी ताशी 165 ते 185 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.
या वादळामुळे आंध्रप्रदेशाच्या अमरावती तसंच उत्तर समुद्र किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, या वादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं आपल्या 25 तुकड्या बचाव कार्यासाठी या भागात पाठवल्या असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. गृहमंत्री अमित शहा, प्रधानमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार पी के सीन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.