तेलंगणामधील निलंबित भाजप आमदार टी. राजा सिंह गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
गेल्या काही काळात राज्यात त्यांच्या अनेक सभा आणि रथयात्रांचं आयोजन करण्यात येत असून येथील भाषणांमध्ये ते मोठ्या प्रमाणात प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचं दिसून येतं.
टी. राजा सिंह यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे त्यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचंही दिसून येतं.
राजा सिंहांच्या सभा आणि वाद
गेल्या एक-दोन महिन्यांपासून राजा सिंह यांच्या महाराष्ट्रात अनेक सभा झाल्या. या प्रत्येक सभेत त्यांनी मुस्लीमविरोधी प्रक्षोभक भाषणे केल्याचं दिसून येतं.
यामध्ये लातूर, सोलापूर, श्रीरामपूर, अहमदनगर, संभाजीनगर, मलंगगड, मुंबई आदी ठिकाणी त्यांच्या प्रत्येक सभेत त्यांनी तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचं दिसून येतं.
या दरम्यान, टी. राजा सिंह यांच्या सभांना काही वेळा परवानगी मिळाली नाही. तर काही ठिकाणच्या भाषणांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले. तरीसुद्धा टी. राजा यांच्या सभा आणि भाषणं थांबलेली नाहीत.
उदाहरणार्थ, 10 मार्च रोजी राजा सिंह यांची एक सभा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे झाली होती. या सभेनंतर श्रीरामपूर पोलिसांनी 16 मार्च रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, राजा सिंह यांच्याविरुद्ध कलम 504 (शांतता बिघडवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करणे), कलम 506 (धमकावणे), कलम 295-A (एखाद्या धर्माविरुद्ध वक्तव्ये करून भावना दुखावणारी कृती), कलम 153-A (दोन धर्मा, वंश किंवा प्रांतांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने करणे) अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
19 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सकल हिंदू एकत्रिकरण समितीने आयोजित केलेल्या एका सभेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र, तरीही या सभेचं आयोजन करून तिथे राजा सिंह यांना पाचारण करण्यात आलं.
शिवाय, शहरातील सिडको भागातील आय लव्ह औरंगाबाद या सुशोभित फलकाचे नुकसान केल्याचा प्रकारही या कालावधीत घडला.
या सर्व प्रकरणी संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुधवारी सुप्रीम कोर्टात प्रक्षोभक वक्तव्यांप्रकरणी एक सुनावणी झाली होती. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हेट स्पीच विरोधात राज्य सरकारांवर ताशेरे ओढल्याचं दिसून आलं होतं.
एका बाजूला सुप्रीम कोर्टाकडून अशा प्रकरणांमध्ये परखड मत नोंदवलं जात असताना टी. राजा सिंह यांच्यासारख्या नेत्यांकडून प्रक्षोभक वक्तव्ये करण्याचं सत्र सुरूच आहे, ही चिंतेची बाब मानली जात आहे.
टी. राजा सिंह यांची गेल्या महिनाभरातील वक्तव्ये खालीलप्रमाणे -
लव्ह जिहाद, गोहत्येसंदर्भात कायदा बनवला नाही, तर ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी 12व्या वर्षी कसायाचं हात कापून गोमातेचं रक्षण केलं, तसं आम्ही भारताचे हिंदू तलवार उचलून उत्तर देऊ.
केरळमध्ये 35 हजार तरुणी लव्ह जिहादने पीडित असल्याचा दावा.
दर्ग्यामध्ये मन्नत मागणाऱ्यांनो तुमच्या घरात छत्रपती शिवाजी असावा की अफजल खान जन्मावा.
कोणत्याही वस्तूंची खरेदी तिलकधारी व्यक्तींकडूनच करा.
जो हिंदू हित की बात करेगा वहीं देश पे राज करेगा.
तुम्ही औरंगाबादमध्ये जन्मला आहात, तरी संभाजीनगरमध्ये हिंदू राष्ट्रात तुम्हाला मरण येईल.
काही जण औरंगाबाद, उस्मानाबादचं नाव बदलण्याला विरोध करत आहेत, ही तर सुरुवात आहे. भविष्यात अहमद नगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर आणि हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्यात येईल.
शिवाजी महाराज-औरंगजेब कधीच भाऊ बनू शकणार नाहीत. वीर महाराणा प्रताप आणि अकबर कधीच भाऊ बनू शकणार नाहीत. वंदे मातरम बोलणारे आणि वंदे मातरमला विरोध करणारे कधीच भाऊ बनणार नाहीत.
पोलिसांनी गरबामध्ये लव्ह जिहादींचा प्रवेश रोखावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना रोखू. नंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली म्हणून आम्हाला दोष देऊ नका.
कोण आहेत टी. राजा सिंह?
टी. राजा सिंह तेलंगणातील गोशामहल मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात येण्याआधी ते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते.
2014 च्या निवडणुकांआधी टी. राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते तेलुगू देसम पक्षात होते. 2009 मध्ये ते तेलुगू देसमच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गोरक्षण अभियानासाठी ते हैदराबाद आणि परिसरात ओळखले जातात.
तेलंगणात 2018 च्या निवडणुकांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची हवा होती, त्यावेळी अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, त्यातही तेलंगणा भाजपचे 5 आमदार निवडून आले होते त्यापैकी एक टी. राजा होते.
टी. राजा यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी 75 पेक्षा जास्त तक्रारी दाखल आहेत.
भाजपचे तेलंगाणातील आमदार टी. राजा सिंह यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजपने त्यांचे निलंबन केले आहे. याआधी तेलंगाणा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला.
यानंतर भाजपने टी. राजा यांना नोटीस दिली होती, तुमचे निलंबन का करण्यात येऊ नये याबद्दल कारणे दाखवा नोटीस टी. राजा सिंह यांना बजावली आहे. पक्षाने त्यांना दहा दिवसांचा अवधी दिला. नंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं.
कॉमेडियन मुन्नवर फारूकीचा हैदराबादमध्ये कॉमेडी शो होता. त्याला टी. राजा सिंह यांनी विरोध केला. मुन्नवर फारूकीने हिंदू देवी देवतांची टिंगल उडवली त्यामुळे त्याचा शो होऊ देऊ नये असं राजा सिंह यांचे म्हणणं होतं.
गोशामहल येथील भाजपचे आमदार राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी काही वक्तव्यं केली. त्यावरून वादाला तोंड फुटलं. सोमवारी रात्री हैदराबाद येथील मुस्लिमांनी राजा सिंह यांच्या अटकेची मागणी केली होती.
चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषेचा वापर केला म्हणून हैदराबाद पोलिसांनी राजा सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. अटकेनंतर राजा सिंह यांना बोल्लाराम पोलीस स्थानकात नेण्यात आलं होतं.
टी. राजा यांची पूर्वीची वादग्रस्त वक्तव्ये
टी. राजा सिंह यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यं केली.
2021 मध्ये टी. राजा म्हणाले होते की "जे लोक बीफ खातात त्यांनी राम मंदिरासाठी देगणी देऊ केल्यास ती घेऊ नये. अशा लोकांकडून एक रुपया देखील स्वीकारू नये."
"जे लोक वंदे मातरम म्हणणार नाहीत त्यांना या देशात राहण्याचा अधिकार देखील नाही," असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
"जुने हैदराबाद हे मिनी पाकिस्तान आहे," असं देखील वक्तव्य केलं होतं. आणि जर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी छापे मारले तर त्यांना खूप सारे बॉम्ब आणि हत्यारे सापडतील, असं विधान त्यांनी केलं होतं.
पद्मावत चित्रपटावेळी देखील टी. राजांनी वक्तव्य केलं होतं, जर या चित्रपटात हिंदूची प्रतिमा खराब दाखवण्यात आली असेल तर आम्ही त्याचे प्रदर्शन थांबवू असे त्यांनी म्हटलं होतं.