25 मे 2024 हा गुजरातसाठी काळा दिवस ठरला, जेव्हा राजकोटचा टीआरपी गेमिंग झोन भडकला. आग, धूर आणि चेंगराचेंगरीत 12 मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला. राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 12 मुलांसह 27 जणांचा मृत्यू याप्रकरणी गुजरात सरकारने आणखी एक कारवाई केली आहे. राजकोट महापालिकेचे प्रमुख, पोलिस आयुक्त आणि दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांच्या जागी आयपीएस अधिकारी ब्रिजेश कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकोटचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन, वाहतूक आणि गुन्हे) विधी चौधरी आणि आयपीएस अधिकारी सुधीर कुमार जे देसाई यांचीही बदली करण्यात आली आहे. यासोबतच गुजरात सरकारने राजकोट महापालिका आयुक्त आनंद पटेल यांचीही बदली केली आहे. त्यांच्या जागी डीपी देसाई यांना राजकोट महापालिकेचे आयुक्त करण्यात आले आहे.
यापूर्वी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाल्यानंतर गुजरात हायकोर्टाने राज्य सरकार आणि राजकोट महापालिकेला फटकारले होते. एवढ्या मोठ्या इमारतीच्या बांधकामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे का, असा सवाल न्यायालयाने केला होता. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
सरकारने दोन पोलिस निरीक्षकांसह सात अधिकाऱ्यांना निष्काळजीपणासाठी निलंबित केले आहे. याशिवाय या प्रकरणात आतापर्यंत एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, गुजरात काँग्रेसचे प्रमुख शक्तिसिंह गोहिल यांनी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि भाजपच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.