मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर येथे रविवारी एक भीषण अपघात झाला. भागवत कथेदरम्यान शिवलिंग बांधणाऱ्या लोकांवर भिंत पडली, अपघातात नऊ मुलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सावन महिन्यात शाहपूरच्या हरदौल मंदिरात शिवलिंगाचे बांधकाम आणि भागवत कथेचे आयोजन सुरू आहे. त्यात शेकडो लोक सहभागी होण्यासाठी येत आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लहान मुलेही मोठ्या संख्येने पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी आली होती.
मुले एका जागी बसून शिवलिंग बनवत असताना मंदिर परिसरालगत असलेल्या एका घराची पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत कोसळली. ही भिंत मुलांवर पडल्याने नऊ मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. लोकांनी भिंतीचा ढिगारा काढण्यास सुरु केले नंतर त्याखाली दबलेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर लोकांनी जखमींना घेऊन शाहपूर हॉस्पिटल गाठले, मात्र तेथे एकही डॉक्टर आढळला नाही. अशा स्थितीत लोकांनी नाराजी व्यक्त केली. येथील डॉक्टर अधूनमधून रुग्णालयात येतात आणि स्वाक्षरी करून निघून जातात, असे लोकांकडून सांगण्यात आले. त्यांनी सांगितले की, जेव्हा मुलांना हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा पट्टी लावणारी व्यक्तीही उपस्थित नव्हती.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्स वर लिहिले आहे की, सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये अतिवृष्टीमुळे जीर्ण घराची भिंत कोसळून 9 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दुःख झाले आहे. जखमी मुलांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मृत बालकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दुर्घटनेत जखमी झालेल्या इतर मुलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. ज्या कुटुंबांनी निष्पाप मुले गमावली आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. मृत मुलांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.