Uday Lalit :देशातील अनेक नामवंत कायदे तज्ज्ञांनी आतापर्यंत देशाचे सरन्यायाधीश म्हणून धुरा सांभाळली आहे. आता सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळीत हे देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून येत्या 27 ऑगस्टला पदभार स्वीकारणार आहेत.
न्यायमूर्ती उदय उमेश लळित हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. लळित हे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रवासियांसाठी ही एक अभिमानाी बाब असणार आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून लळित यांच्या नावाची शिफारस केली आहे.
न्यायमूर्ती लळित हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश असतील. एन व्ही रमणा या महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत, त्यानंतर लळित हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. ज्येष्ठतेच्या आदेशानुसार न्यायमूर्ती लळित हे सरन्यायाधीश होण्याचे दावेदार होते. न्यायमूर्ती लळित हे तिहेरी तलाकसारखे महत्त्वाचे निर्णय देणार्या खंडपीठाचा एक भाग आहेत ज्याचा देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
न्यायमूर्ती लळित हे देशातील दुसरे सरन्यायाधीश असतील, जे बार कौन्सिलमधून न्यायाधीश बनले आणि नंतर त्यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली. यापूर्वी हे मार्च 1964 मध्ये घडले होते. तेव्हा न्यायमूर्ती एस एम सिक्री यांना बार कौन्सिलमधून न्यायाधीश होण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते 1971 मध्ये सरन्यायाधीश देखील झाले.
न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा हे 26ऑगस्ट रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती लळित दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती लळित हे देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक आहेत आणि त्यांची 13 ऑगस्ट 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा भाग आहेत.
विशेष म्हणजे न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर येथे आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंबीय या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय कुंभवडे, पेंढरी, हरचेरी चुना-कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ आपटे या गावांमध्ये स्थलांतरित झाले. लळीत यांचे आजोबा, चार काका, वडील वकिली करायचे. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीला गेले. सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.