बँकेकडून कर्ज घेणे सोपे काम नाही. अनेकवेळा बँक कर्ज देण्यासही नकार देते, पण कर्नाटकातील हावेरीमध्ये एका व्यक्तीला नकार मिळाला तर त्याला एवढा राग आला की त्याने बँक पेटवून दिली. प्रकरण गेल्या रविवारचे आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कगिनेल्ली पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कर्जाची गरज होती आणि त्यासाठी तो बँकेत गेला होता. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँकेने त्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने रविवारी बँकेलाच आग लावली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वसीम हजरतसाब मुल्ला असे आरोपीचे नाव असून तो रत्तीहल्ली क्षेत्रातील रहिवासी आहे.
कर्जाचा अर्ज फेटाळल्याने संतापलेल्या आरोपीने रात्री उशिरा बँकेची शाखा गाठली. त्यांनी बँकेची खिडकी तोडून बँकेच्या कार्यालयात पेट्रोल टाकले. यानंतर कार्यालयाला आग लावण्यात आली.
या आगीत 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच संगणक, पंखे, दिवे, पासबुक प्रिंटर, कॅश मोजण्याचे यंत्र, कागदपत्रे, सीसीटीव्ही आणि कॅश काउंटर जळाले.