संतापलेल्या लोकांनी चक्क आग्रा शहराच्या भागाचं बारसं केलं...
, शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (23:20 IST)
आग्रा शहरातील काही लोकांनी दुर्गंधीला कंटाळून आपल्या शहराचं तात्पुरतं बारसंच करुन टाकलंय. नाला कॉलनी, दुर्गंधी शहर असे फलकच त्यांनी शहरात लावले आहेत.
जगदिशपुरा आणि शाहगंज इथल्या लोकांनी हे केलं आहे. इथले रस्ते अपूर्ण असल्यामुळे पाणी साठून रहातंय आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होतेय.
या दोन्ही वस्त्यांमधल्या लोकांनी आपल्या परिसरात पसरलेल्या घाणीची तक्रार केली आहे.
अनेकदा तक्रार करुनही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे.
या मतदारसंंघाच्या प्रतिनिधी बेबी राणी मौर्या यांचे प्रतिनिधी म्हणाले, रस्त्याचं काम पूर्ण होण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.
पण चिडलेल्या लोकांनी सरकारी फलकांप्रमाणेच हिरव्या -पांढऱ्या रंगाचे नव्या नावांचे फलक लावले आहेत. हे फलक इमारतींवर, चौकांत लावले आहेत.
नवनीत नगराचं नाव बदबू नगर, मानसरोवर नगराचं नाव नालासरोवर नगर, पंचशील क़ॉलनीचं दुर्गंधशील कॉलनी असं नामांतर करण्यात आलंय.
ही नावं अधिकृत नसली तरी 23 लाख लोकांच्या या शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
स्थानिकांनी याप्रकारे लावलेले काही फलक अधिकाऱ्यांनी काढले असं रहिवाशांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.
शाहगंज आणि जगदीशपुरामधील रहिवासी बीबीसीशी बोलताना म्हणाले, रस्त्याचे बांधकाम अपुरे राहिल्यामुळे 28 रहिवाशी संकुलांना त्रास होत आहे. पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे त्रासात भर पडली आहे.
प्रशांत सिकारवार हे 29 वर्षांचे व्यावसायिक सांगतात, या कच्च्या रस्त्यामुळे त्यांचया दोन्ही मुलांना पावसाळ्यात शाळेला जाताना त्रास होतो.
पावसाळ्यात रस्ते खराब झाल्यामुळे स्कूलबस इथं यायला तयार होत नाहीत. अनेक दिवस माझी मुलं शाळेला जाऊ शकत नाही. तसेच गरजेच्या वेळेस रुग्णवाहिकेला पोहोचण्यासाठी त्रास होतो.
पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे पाहुणेही इथं येत नसल्याचं सिकरवार सांगतात.
स्थानिक यंत्रणेकडे वारंवार तक्रारी करुनही रस्त्याचं बांधकाम झालेलं नाही असं ते सांगतात.
प्रल्हाद सिंग नावाचे दुकानदार सांगतात, इथं कचऱ्याचे ढीग रस्त्यावर साठतात त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरते.
हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे, डासही वाढलेत, लोकांना घरं विकून जावं लागतंय. असं सांगून मी सुद्धा दुकान विकून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो असं प्रल्हाद सांगतात.
आता रस्ता नाही तर मत नाही अशी मोहीम हाती घेण्याचा विचार रहिवासी करत आहेत. ते म्हणाले, 'राजकारण्यांनी आमची विनंती ऐकून मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. आता आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय.'
Published By- Priya Dixit
पुढील लेख