Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदी इजिप्तच्या ज्या मशिदीत जाणार आहेत, त्या मशिदीचं ‘हे’ आहे भारत कनेक्शन

Webdunia
रविवार, 25 जून 2023 (10:36 IST)
अमेरिका दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी 24 आणि 25 जून असे दोन दिवस इजिप्तमध्ये असतील. या दौऱ्यादरम्यान इजिप्तमधील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीत जाणार आहेत.
 
परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पंतप्रधान मोदींच्या अल-हाकिम मशिदीच्या दौऱ्याबद्दल माहिती देताना सांगितलं की, “इजिप्तमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जूनला अल-हकीम मशिदीचा दौरा करतील. 11 व्या शतकात ही मशीद बनवली गेली होती आणि दाऊदी बोहरा समाजानं या मशिदीचा जीर्णोद्धार केला होता.”
 
1979 साली या मशिदीचा ऐतिहासिक कैरोचा भाग म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.
 
याशिवाय मोदी 'हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह सेमेटरी'लाही भेट देणार आहेत. येथे मोदी पहिल्या महायुद्धात इजिप्तसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील.
 
पंतप्रधान मोदींचा हा पहिला इजिप्त दौरा आहे आणि 1997 नंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा इजिप्तचा पहिला अधिकृत दौरा आहे.
 
अल-हकीम मशिदीचा इतिहास
इजिप्तची राजधानी कैरो इस्लामिक वास्तुकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
 
इस्लामशी संबंधित इमारती आणि वेगवेगळ्या कालखंडातील मशिदी आहेत. या मशिदींपैकी एक म्हणजे अल-हकीम मशीद.
 
अल-हकीम मशिदीबद्दल माहिती देताना प्रोफेसर डोरिस बेहरेन्स अबुसैफ यांनी त्यांच्या 'इस्लामिक आर्किटेक्चर इन कैरो : अॅन इंट्रोडक्शन' या पुस्तकात लिहिलं की, अल-हकीम मशीद ज्या परिस्थितीत बांधली गेली, ती परिस्थिती असामान्य आहे.
 
मशिदीचे बांधकाम दहाव्या शतकाच्या शेवटी (इ.स. 990) फातिमिद राजघराण्यातील पाचवे खलिफा अल-अजीझ याने सुरू केले.
 
फातिमिद राजवंश हा अरब वंशाचा इस्माइली शिया राजघराणा होता.
 
इमारतीचं बांधकाम अपूर्ण असतानाच, म्हणजे बांधकाम सुरू झाल्यानंतर एका वर्षानंतर मशिदीमध्ये पहिल्यांदा नमाज पढला गेला होता.
 
इतिहासकारांचे असे मत आहे की, तोपर्यंत मशिदीत केवळ नमाजासाठीची खोलीच बांधण्यात आली होती.
 
अमेरिकन इतिहासकार जोनाथन एम. ब्लूम यांच्या ‘द मॉस्क ऑफ अल-हकीम इन कैरो’ या पुस्तकातील माहितीनुसार, अपूर्ण राहिलेल्या मशिदीत सुमारे 12 वर्षे नमाज अदा केलं गेलं आणि 1002-03 मध्ये अल-अजीझचा मुलगा आणि फातिमिद राजघराण्याचा सहवा खलिफा अल-हकीन यानं मशिदीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली.
 
या अल-हकीमच्या नावावरून मशिदीला अल-हकीम असं नाव देण्यात आलं.
 
दहा वर्षांनंतर म्हणजे 1013 मध्ये मशीद बांधून पूर्ण झाली.
 
यावेळी मशिदीची लांबी 120 मीटर आणि रुंदी 113 मीटर होती.
 
ही मशीद आकारानं प्रसिद्ध अल-अझहर मशिदीच्या दुप्पट होती आणि बांधकामाची एकूण किंमत 45 हजार दिनार होती.
 
तेव्हा खरंतर मशीद कैरौ शहराच्या भींतींच्या बाहेर होती. मात्र, 1087 साली मशीद शहराच्या मध्यभागी पोहोचली.
 
हे काम फातिमिद राजघरणाच्या आठवा खलिफा अल-मुस्तानसीरचे वजीर बद्र अल-जमाली यांनी केलं.
 
बद्र अल-जमालीने कैरोच्या शहराच्या भिंती उत्तर दिशेला वाढवून मशिदीपर्यंत नेल्या.
 
जेव्हा मशिदीचे नुकसान झाले होते...
13 व्या शतकाच्या मध्यात इजिप्तमध्ये मामलुक साम्राज्याची सत्ता स्थापन झाली होती.
 
1303 मध्ये इजिप्तमध्ये भूकंप झाला आणि त्यामुळे गिझा पिरॅमिडसह अनेक मशिदींचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या मशिदींमध्ये अल-हकीम मशिदीचाही समावेश होता.
 
यानंतर मामलुक साम्राज्याचा सुलतान अबू-अल-फतहने पुनर्बांधणीचं काम केलं.
 
तोपर्यंत मशिदीचा वापर इस्लामिक शिक्षणासाठीही होत होता.
 
आधुनिक संरचनेपूर्वी काही शतकं मशिदीचा आतील भाग भग्नावस्थेत पडला होता आणि मशीद म्हणून अधूनमधूनच वापर होत होता.
 
लेखिका कॅरोलिन विल्यम्स यांनी त्यांच्या 'इस्लामिक मोन्युमेंट्स इन कैरो : अ प्रॅक्टिकल गाईड' या पुस्तकात म्हटले आहे की, वेगवेगळ्या कालखंडात मशिदीच्या संकुलाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाटी केला जात होता.
 
ख्रिश्चन धर्मयुद्धादरम्यान मशिदीचा वापर तुरुंग म्हणून, अय्युबी राजघराण्यातील सलाऊदीनने तबेला म्हणून, नेपोलियनने किल्ला म्हणून, 1890 च्या दशकात इस्लामिक कला संग्रहालय म्हणून आणि नंतर 20 व्या शतकात मुलांची शाळा म्हणून वापर झाला होता.
 
दाऊदी बोहरा समाजानं घेतली बांधकामाची जबाबदारी
1970 च्या उत्तरार्धात पुन्हा एकदा मशिदीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाले.
 
या बांधकामाची जबाबदारी दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे धर्मगुरू मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी घेतली होती.
 
मोहम्मद बुरहानुद्दीन हे भारताशी संबंधित होते आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन सन्मानित केले.
 
अल-हकीम मशिदीच्या नूतनीकरणासाठी सफेद संगमरवर आणि सोन्याच्या सजावटीचा वापर करण्यात आला. या कामासाठी जवळपास 27 महिने लागले.
 
यानंतर 24 नोव्हेंबर 1980 रोजी मशीद अधिकृतपणे उघडण्यात आली.
 
उद्घाटनासाठी मोठ्या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
या समारंभाला इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात, मौलवी मोहम्मद बुरहानुद्दीन, उच्च सरकारी अधिकारी आणि अल-अजहर विद्यापीठाशी संबंधित धार्मिक लोक उपस्थित होते.
 
जवळपास चार दशकांनंतर 2017 मध्ये दाऊदी बोहरा समुदाय आणि इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाने मशिदीसंदर्भात एक संयुक्त उपक्रम सुरू केला.
 
याअंतर्गत मशिदीच्या वास्तूच्या नूतनीकरणासोबतच मशिदीच्या भिंतींना ओलाव्यापासून वाचवण्यासाठी संरक्षण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे होते.
 
2017 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2023 पर्यंत चालला आणि सहा वर्षांत 20 कोटींहून अधिक रुपये खर्च झाले. त्यानंतर या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात इजिप्तमधील चौथी सर्वात जुनी आणि दुसरी सर्वात मोठी अल-हकीम मशीद पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
 
मोदींच्या दौऱ्याबद्दल दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांना काय वाटतं?
पंतप्रधान मोदींची अल-हकीम मशिदीला भेट आणि त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी बीबीसीने दाऊदी बोहरा समुदायाशी संबंधित लोकांशी संवाद साधला.
 
मुंबईतील एका महाविद्यालयात शिकवणारे डॉ. तालिब युसूफ म्हणतात की, दाऊदी बोहरा समाजासह संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असेल.
 
डॉ. तालिब युसूफ म्हणतात, “दाऊदी बोहरा हा भारतातील एक छोटा समुदाय आहे आणि पंतप्रधान मोदी अल-हकीम मशिदीला भेट देत आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. हे पाऊल जगाला देशाच्या एकता आणि अखंडतेचा संदेश देईल.”
 
अल-हकीम मशिदीबद्दल डॉ. तालिब म्हणाले, "इजिप्तची अल-हकीम मशीद जगभरात स्थायिक झालेल्या दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांसाठी खास आणि ऐतिहासिक आहे. यामध्ये मुस्लिम धर्माचे पालन करणारे सर्व समाजाचे लोक जाऊन नमाज अदा करतात”.
 
पंतप्रधान मोदींबद्दल बीबीसीशी बोलताना दाऊदी बोहरा समाजातील आणखी एका व्यक्तीने सांगितले की, मोदींची बोहरा समाजाप्रती असलेली ओढ गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून आहे.
 
ते म्हणतात, "जेव्हाही पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जातात आणि तेव्हा तिथल्या दाऊदी बोहरा समुदायाच्या लोकांना अगदी आवर्जून भेटतात. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत आणि गुजरातमध्ये दाऊदी बोहरांची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांबद्दलची ओढ दिसून येते.”
 
मशिदीची रचना
अल-हकीम मशीद कैरोमधील फातिमिद वास्तुकला आणि इतिहासाचे एक अद्वितीय उदाहरण आहे.
 
या आयताकृती मशिदीचं क्षेत्रफळ 13 हजार 560 चौरस मीटर एवढं आहे. या मशिदीच्या मध्यभागी पाच हजार चौरस मीटरचे मोठे अंगण आहे.
 
अंगणात मोठमोठे हॉल बांधले आहेत.
 
मशिदीची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या दोन्ही टोकांना बांधलेले मिनार, जे मशिदीच्या सुरुवातीच्या काळात बांधले गेले होते.
 
दोन्ही मिनारांची रचना तत्कालीन मिनारांच्या तुलनेत स्वतंत्र ओळख सांगणारी आहे.
 
या मिनारांचा बाहेरील भाग आणि पाया मामलुक शैलीमध्ये बनवला गेलाय, तर आतील गाभा फातिमिद शैलीमध्ये बनवला गेला आहे.
 
मशिदीचा मुख्य भाग आणि मिनार दगडाचे आहेत, तर उर्वरित बांधकामात विटांचा वापर करण्यात आला आहे.
 
मशिदीत एकूण 13 दरवाजे असून अंगणाच्या मध्यभागी पाण्याचा स्त्रोत आहे.
 
मोदी परदेशात किती वेळा मशिदीत गेले?
परदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मशिदीत जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
याआधी मोदींनी ओमान ते संयुक्त अरब अमिराती या दौऱ्यात मशिदीला भेट दिली आहे.
 
शेख झायेद मशीद : ऑगस्ट 2015 मध्ये मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. या भेटीच्या पहिल्या दिवशी मोदींनी ऐतिहासिक शेख झायेद मशिदीलाही भेट दिली.
 
त्यावेळी UAE चे उच्च शिक्षण मंत्री शेख हमदान बिन मुबारक अल नाहयान हे देखील मोदींसोबत उपस्थित होते.
 
सुलतान काबूस मशीद : फेब्रुवारी 2018 मध्ये मोदी पश्चिम आशियातील जॉर्डन, पॅलेस्टाईन, यूएई आणि ओमान या चार देशांच्या दौऱ्यावर गेले.
 
यादरम्यान मोदींनी ओमानची राजधानी मस्कत येथील सुलतान काबूस मशिदीलाही भेट दिली.
 
ही ओमानमधील सर्वात मोठी मशीद आहे, जी भारतीय वाळूच्या दगडापासून बनलेली आहे.
 
चुलिया मशीद : मे-जून 2018 मध्ये मोदींनी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांना भेट दिली.
 
सिंगापूर दौऱ्यात मोदी आधी श्री मरिअम्मन मंदिरात आणि नंतर चुलिया मशिदीत पोहोचले.
 
ही मशीद चुलिया मुस्लिम समुदायाने बांधली आहे, जो तमिळ मुस्लिमांचा समुदाय आहे.
 
इस्तिकलाल मशीद : ही मशीद इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे स्थित जगातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे.
 
मे 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या मशिदीत पोहोचले होते आणि इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती जोको विडोडो त्यांच्यासोबत उपस्थित होते.
 




Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments