बोगद्याच्या आतच वैद्यकीय सुविधांची तयारी
उत्तरकाशी बोगद्याच्या आत मजुरांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मजूर बोगद्यातून बाहेर आल्यानंतर तिथेच त्यांना प्राथमिक उपचार दिले जातील.
आरोग्य विभागानं बोगद्याच्या आत 8 बेड्सची सुविधा केलीय.
आरोग्याची आणखी काही समस्या निर्माण झाल्यास रुग्णवाहिका आणि डॉक्टरही तैनात करण्यात आले आहे.
ढिगाऱ्याचा शेवटचा भाग कोसळला आणि मजुरांनी जल्लोष केला
बचावकर्त्यांपैकी एकाने आम्हाला सांगितलं की “ज्या क्षणी आम्ही ढिगाऱ्याचा शेवटचा भाग तोडला त्याच क्षणी बोगद्यात जल्लोष झाला. मागच्या 17 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांनी उत्साहात टाळ्या वाजवायला सुरुवात केली."
तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की, शांत राहा, धीर धरा, आम्ही तुम्हाला एक-एक करून बाहेर काढू.
बोगद्याच्या तोंडाजवळ नातेवाईकांची गर्दी
सिलक्यारा बोगद्याजवळ मागच्या 17 दिवसांपासून ताटकळत उभ्या राहिलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या या बोगद्यावर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
आता कोणत्याही क्षणी हे बचावकार्य संपल्याची घोषणा होऊन 41 मजूर बाहेर येऊ शकतात.
बोगद्याच्या तोंडावर रुग्णवाहिकांचा ताफा तर तयार आहेच आणि परिसरातील लोकांनीही आजूबाजूच्या डोंगरांवर गर्दी केलीय. अडकलेल्या मजुरांचे नातेवाईकही अधीर होऊन त्यांची वाट बघत आहेत.
बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर मजुरांना 'इथे' आणणार
मागच्या 17 दिवसांपासून उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचा क्षण आता जवळ आलाय. अवघ्या काही तासांमध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु होईल.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी स्वतः याबाबत माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार बोगद्यात पाईप टाकण्याचं काम आता पूर्ण झालंय आणि आता मजूर बाहेर येण्याची सगळे वाट बघत आहेत.