Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तरकाशी बोगदा दुर्घटनाः चार दिवस उलटूनही मजुरांची सुटका नाही, नवीन मशीनवर सारी भिस्त

Webdunia
गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (11:50 IST)
-आसिफ अली
चार दिवस उलटून गेल्यानंतरही उत्तरकाशीतल्या टनेलमध्ये अडकलेल्या मजुरांची सुटका होऊ शकलेली नाही.
 
आता अमेरिकन ऑगर मशीन वापरून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले जातील. या बोगद्यात 40 मजूर अडकले आहेत.
 
इथे बचावकार्य करणाऱ्या मशीनचा एक भाग खराब झाल्याने आता उच्च क्षमतेचं अमेरिकन ऑगर मशीन दिल्लीहून मागवण्यात आलं आहे.
 
हे मशीन बोगद्यात इंस्टॉल करण्याची प्रक्रिया आता पूर्ण होत आली आहे.
 
नवयुगा इंजिनिअरिंग कंपननीचे पीआरओ गिरधारीलाल नाथ यांनी सांगितलं की, “हे अमेरिकन ऑगर मशीन एक उच्च दर्जाचं यंत्र असून याचा बचावकार्यात उपयोग होईल.”
 
ते पुढे असंही म्हणाले की आता बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश येईल अशी आम्हाला आशा आहे.
 
“हे मशीन अयशस्वी ठरणं शक्य नाही,” असंही त्यांनी सांगितलं.
 
अमेरिकन आगर मशीन एअरफोर्सच्या C1, 30 के 3 या एअरक्राफ्टने दिल्लीहून उत्तरकाशीला पोहचवण्यात आलं.
 
उत्तरकाशीच्या चिन्यालीसौड धावपट्टीपासून ते बोगद्यापर्यंत या यंत्रांचे वेगवेगळे पार्ट ट्रकने पोहचवण्याच आले.
 
याआधी काय काय झालं?
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगद्यात 40 मजूर अडकून 72 तासांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत.
 
बोगद्यातील ढिग खोदण्यासाठी वापरण्यात आलेले ऑगर मशीन मंगळवारी बोगद्यात पाठवण्यात आल्यानंतर मदतकार्य लवकरच पूर्ण होईल, असं वाटत होतं. मात्र बुधवारी सकाळी समजलं की मशिनने योग्य पद्धतीने ड्रिल होत नाहीये.
 
अशा स्थितीत त्या मशिनसाठी जो बेस बनवला होता तो काढून आता पुन्हा नवीन बेस तयार केला जातोय.
 
एसडीआरएफचे निरीक्षक भास्कर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "कंपनीच्या लोकांनी सांगितलंय की ऑगर मशीनमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला आहे. आता फक्त तांत्रिक टीमच नेमकी समस्या काय आहे हे सांगू शकेल."
 
त्यांनी सांगितलं की, "कंपनीचं दुसरं मशीन दिल्लीहून एअरलिफ्ट केलं जात आहे."
 
'सर्व कामगार सुरक्षित आहेत'
एसडीआरएफ सहाय्यक कमांडंट कर्मवीर सिंह भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बोगद्यात अडकलेले सर्व लोक सुरक्षित आहेत. सर्वांशी बोलणं होत असून त्यांना आतमध्ये खाद्यपदार्थ पाठवले जात आहेत."
 
त्यांनी सांगितलं, "बुधवारी पहाटे 5.30 वाजता आतमधील लोकांनी खाद्यपदार्थ मागितले होते. त्यांना त्याचा पुरवठा करण्यात आला आहे. बोगद्यात जिथे लोक आहेत, तिथे प्रकाश व्यवस्था आणि तापमानही योग्य आहे."
 
त्यांच्या मते, "तिथे काम थांबलेलं नाही. चोवीस तास काम सुरू असून आमची दोन पथकं मदतीसाठी तैनात आहेत. बेसवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत."
 
या दुर्घटनास्थळी स्थानिक नेते वारंवार येत असल्यामुळे या मदतकार्यात अडथळा येत आहे असं जनसंपर्क अधिकारी जी. एल. नाथ यांनी सांगितलं आहे.
 
ते म्हणाले, "40 मजुरांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरू आहे, मात्र स्थानिक नेते इथं सतत येऊन बोगद्यात आत जात आहेत. त्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी फार त्रास होत आहेत. त्यांनी तसं करू नये अशी मी विनंती करतो. ते इतर यंत्र, खाण्यापिण्याच्या वस्तू, पदार्थ अशा स्वरुपात मदत करू शकतात."
 
उत्तरकाशी-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारापासून डंडालगावपर्यंतच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात (सिलक्याराकडून) रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास भूस्खलन झालं होतं.
 
36 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेल्यानंतरही या बोगद्यात 40 कामगार अडकलेले आहेत.
 
घटनास्थळी मदत आणि बचावकार्यासाठी SDRF, NDRF, ITBP यासह अग्निशमन दलाची पथकंही उपस्थित आहेत.
 
सरकारकडून या बोगद्याची जबाबदारी NHIDCL कंपनीला देण्यात आली आहे. तर या बोगद्याचं बांधकाम नवयुग या कंपनीकडं सोपवण्यात आलेलं आहे.
 
NHIDCL चे कार्यकारी संचालक कर्नल (निवृत्त) संदीप सुधेरा यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, "टनलच्या आतून 21 मीटरपर्यंतचा ढिगारा उपसण्यात आला आहे."
 
"टनलमध्ये अजूनही 19 मीटरपर्यंत ढिगारा पडलेला आहे."
 
"सिलक्यारा पोटल ( पोटल म्हणजे बोगद्याचं द्वार) पासून सुमारे 205 मीटर आतल्या बाजूने सुमारे 245 मीटरपर्यंत भूस्खलन झालं आहे," असंही ते म्हणाले.
 
"245 मीटरच्या पुढे बोगदा सुरक्षित असून त्यात अडकलेले सर्व लोक सुरक्षित आहेत."
 
संदीप सुधेरा म्हणाले की, "जेव्हा बोगद्यात मशीनद्वारे माती किंवा ढिगाला काढला जातो, तेव्हा त्यानंतर लगेचच भिंतींवर काँक्रिट शॉटक्रिट स्प्रे केलं जातं."
 
"तसं केल्यास काहीशी स्थिरता निर्माण होते आणि काही वेळासाठी भूस्खरन कमी होतं."
 
याबाबत बोलताना उत्तरकाशीचे सीओ प्रशांत कुमार म्हणाले, "आम्ही आताच बोगद्यातून बाहेर आलो आहोत. काल रात्री मजुरांशी आमचा संपर्क झाला होता. एनएचआयडीसीएलच्या ज्या पाईपलाईनमधून पाणी आणि ऑक्सिजन पुरवला जातो त्याच्याद्वारे आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आतल्या लोकांनी ते ठीक असल्याचं सांगितलं. हे बोलणं वायरलेसद्वारे होत आहे. आतल्या लोकांची स्थिती कशी आहे आणि त्यांना कशाची गरज आहे हे यामाध्यमातूनच समजत आहे."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना फोन करून मदतकार्याची माहिती घेतली.
 
बोगद्यात अडकलेले कामगार सुखरूप असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांना बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मात्र, बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी कोणताही संवाद झालेला नाही.
 
अडकलेल्या कामगारांपैकी फक्त एकच उत्तराखंडचा आहे. उर्वरित कामगार बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.
 
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील मदत कर्मचारी स्थानिक पोलिस आणि प्रशासनासोबत एकत्र काम करत आहेत.
 
उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, बोगद्याच्या वरच्या बाजूचा अंदाजे 50 मीटर भाग कोसळला असून तो बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे 200 मीटर अंतरावर आहे.
 
तो भाग बनवण्याचं काम चालू असताना तो कोसळला. ते म्हणाले की, बोगद्यात अडकलेले सर्व लोक आतापर्यंत सुरक्षित आहेत.
 
"रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याच्या सिलक्यारा बाजूकडील प्रवेशद्वाराच्या 230 मीटर आत दगड-माती कोसळली.”
 
काही वेळातच 30 ते 35 मीटर अंतरावरून दगड-माती कोसळायला लागली आणि त्यानंतर अचानक मोठा ढिगारा आणि दगड पडू लागले. त्यामुळे बोगद्यात काम करणारे कामगार आत अडकले. दगड-मातीचा ढीग साचल्याने बोगद्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला.
 
पोलीस अधीक्षक म्हणाले की, ठबोगद्यात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढणं याला आमचं प्राधान्य आहे."
 
यासाठी पोलीस दलाची तुकडी आणि मदत व बचाव पथक 24 तास घटनास्थळी मदतकार्यात व्यस्त राहणार आहेत. उत्तरकाशी पोलिसांनी बचाव मोहीम अपडेट आणि मदत क्रमांक +917455991223 सुद्धा सुरू केलाय.
 
कसा झाला अपघात?
एडीजी कायदा आणि सुव्यवस्था एपी अंशुमन यांनी सांगितलं की, रविवारी पहाटे 5 वाजता हा अपघात झाला, बोगद्यापासून सिलक्याराकडील प्रवेशद्वारापासून आत 200 मीटर अंतरावर भूस्खलन झालं. काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या 2800 मीटर आत होते.
 
काही मीडियाच्या वृत्तानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल म्हणाले की, अडकलेल्या लोकांसमोर 400 मीटर रिकामी जागा आहे. त्यामुळे ते त्यात फिरू शकतात. दहा तास पुरेसा इतका ऑक्सिजन त्यांच्याकडे आहे.
 
बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 13 मीटर रुंद मार्गावर जेसीबी आणि पोकलेन मशिन वापरण्यात येतंय.
 
अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून उत्तरकाशीतील घटनेची माहिती घेतली.
 
पंतप्रधानांनी मुख्यमंत्री धामी यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.
 
या घटनेनंतर आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं धामी यांनी सांगितलं.
 
“मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघाताची संपूर्ण माहिती आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ घटनास्थळी हजर आहेत. सर्वजण सुखरूप बाहेर यावेत, अशी प्रार्थना आम्ही करतोय.
 
नवयुग कन्स्ट्रक्शन कंपनी उत्तराखंडमधील ‘ऑल वेदर रोड प्रोजेक्ट’ अंतर्गत उत्तरकाशीमध्ये एक बोगदा बांधतेय.
 
हा बोगदा ‘नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या देखरेखीखाली बांधला जातोय. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत या बोगद्याचं बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments