Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधी यांच्या 'हिंदू' संदर्भातील विधानावरुन गदारोळ, पंतप्रधान मोदी आणि शाह काय म्हणाले?

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2024 (08:27 IST)
लोकसभेत राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात विविध मुद्दे मांडून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सत्तारुढ पक्षाकडून देखील त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. यात लोकसभेत अनेकदा गदारोळ देखील झाला. राहुल गांधी, पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह आणि ओम बिर्ला या सर्वांच्याच विधानं आणि टिप्पण्यांनी सोमवारचा दिवस गाजला.
 
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ले चढवले.
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर मांडण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळेस बोलण्यास उभे राहिलेल्या राहुल गांधी यांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी जोरदार वादविवाद देखील झाला.
 
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवात हातात संविधानाची प्रत घेऊन केली.
 
राहुल गांधी यांनी भाषण करतानाच भगवान शंकराचा फोटो दाखवून टिप्पणी केली. त्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी राहुल गांधी यांना विरोध केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आपल्या आसनावरून उभे राहिले आणि म्हणाले की राहुल गांधी यांनी 'संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं योग्य नाही.'
 
राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या अग्निवीर योजनेवर देखील हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की अग्निवीर सैनिक एकप्रकारे 'यूज अँड थ्रो' मजूर बनले आहेत.
 
यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की चुकीची विधानं करून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये.
 
राहुल गांधींच्या 'हिंदूं'संदर्भातील विधानावरून गदारोळ
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या भाषणात भगवान शंकराचा फोटो दाखवत म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात एके दिवशी म्हटलं होतं की भारताने कधीही कोणावर आक्रमण केलं नाही. त्यामागे कारण आहे. भारत हा अंहिसेचा देश आहे. तो घाबरत नाही."
 
ते पुढे म्हणाले, आपल्या महापुरुषांनी 'घाबरू नका, घाबरवू नका' हा संदेश दिला आहे. भगवान शंकर म्हणतात की "घाबरू नका, घाबरवू नका आणि असं म्हणत त्यांनी त्रिशूल जमिनीत गाडलं आहे."
 
"दुसऱ्या बाजूला जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा...द्वेष-द्वेष-द्वेष करतात...तुम्ही हिंदू नाहीत. हिंदू धर्मात स्पष्ट म्हटलं आहे की सत्याची पाठराखण केली पाहिजे."
भगवान शंकर म्हणतात की घाबरू नका, घाबरवू नका आणि असं म्हणत त्यांनी त्रिशूल जमिनीत गाडलं आहे. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष करण्यास सांगतात, असत्य बोलतात."
 
राहुल गांधी यांच्या विधानानंतर सत्तारुढ पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि म्हणाले, "हा विषय खूपच गंभीर आहे, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब आहे."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिप्पणी नंतर राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजपा म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही."
 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले राहुल गांधी यांच्या विधानावर टिप्पणी करताना म्हणाले, "संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं योग्य नाही. जे हिंसा करतात त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. राहुल गांधी स्वत: हिंदू आहेत. इतकंच काय, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी हिंदू आहेत. जर हिंदू हिंसक आहेत तर मग राहुल गांधीसुद्धा हिंसक आहेत का?"
 
काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, "मी राहुल गांधी यांच्या प्रत्येक शब्दाचं समर्थन करतो. त्यांचं बोलणं तर्कशुद्ध आहे. भाजपावाले भगवान रामाचे व्यापारी होते, म्हणूनच अयोध्येत त्यांचा पराभव झाला."
 
राहुल गांधी म्हणाले, अग्निवीर सैनिक म्हणजे यूज अँड थ्रो मजूर
राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या अग्निवीर योजनेवर तिखट हल्ले चढवले.
 
ते म्हणाले, "एका भूसुरुंगामुळे एक अग्निवीर शहीद झाला. मी त्याला शहीद म्हणतो आहे, मात्र भारत सरकार आणि नरेंद्र मोदी त्याला शहीद म्हणत नाहीत. ते अग्निवीर म्हणतात, त्याला पेन्शन मिळणार नाही. त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्याला शहीदचा दर्जा मिळणार नाही."
 
राहुल गांधी म्हणाले, "भारताच्या एका सर्वसाधारण जवानाला पेन्शन मिळेल. मात्र एका अग्निवीराला जवान नाही म्हटलं जाऊ शकत. अग्निवीर हे यूज अँज थ्रो मजूर आहेत. त्यांना तुम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण देता आणि पाच वर्षांचं प्रशिक्षण घेतलेल्या चीनच्या जवानासमोर उभं करता."
 
त्यांनी सरकारवर आरोप केला की, "तुम्ही जवानांमध्ये भेदाभेद करत आहात, त्यांच्यात फूट पाडत आहात. एका जवानाला पेन्शन मिळेल, शहीदाचा दर्जा मिळेल आणि दुसऱ्या जवानाला पेंशन मिळणार नाही, शहीदाचा दर्जा मिळणार नाही. असं करून तुम्ही स्वत:ला देशभक्त म्हणवून घेत आहात. हे कोणत्या प्रकारचे देशभक्त आहेत."
 
राहुल गांधी पुढे म्हणाले, "देशाच्या सैन्याला माहित आहे, सर्व देशाला माहित आहे. अग्निवीर योजना ही सैन्यानं नाही तर पंतप्रधानांच्या कार्यालयानं (पीएमओ) आणलेली योजना आहे. संपूर्ण सैन्याला माहित आहे की या योजनेची मूळ संकल्पना पंतप्रधानांची होती. या योजनेची संकल्पना सैन्यानं पुढे आणलेली नाही."
 
अग्निवीरवर राजनाथ, अमित शाह यांचं उत्तर
राहुल गांधी आपल्या भाषणात अग्निवीर योजनेबद्दल बोलत असतानाच मध्येच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उभे राहिले आणि त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "चुकीची विधानं करून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता कामा नये."
 
राजनाथ सिंह म्हणाले, "मला ही गोष्ट स्पष्ट करायची आहे की युद्धात किंवा सीमेचं रक्षण करताना जर एखाद्या अग्निवीराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाते."
 
यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधी यांना सभागृहात खोटं न बोलण्याची सूचना केली.
 
अमित शाह म्हणाले, "हे (राहुल गांधी) म्हणतात की, एक कोटी रुपये मिळत नाहीत. राजनाथ सिंह यांनी अधिकृतपणे सांगितलं की शहीद होणाऱ्या अग्निवीराला एक कोटी रुपये मिळतात. त्यांनी सभागृहात खऱ्या माहितीच्या आधारावर वस्तुनिष्ठपणे (फॅक्च्युअल पोजिशन) मांडणी केली पाहिजे. हे सभागृह म्हणजे खोटं बोलण्याची जागा नाही."
 
ते पुढे म्हणाले, "इथं खरं बोललं पाहिजे आणि यांनी खरं सांगितलं नाही आणि आपलं विधान खरं असल्याचं सिद्ध केलं नाही तर त्यांनी सभागृह, देश आणि अग्निवीरांची माफी मागितली पाहिजे."
 
अमित शाह सभागृहात बोलल्यानंतर राहुल गांधी पुन्हा आपला मुद्दा मांडला. राहुल गांधी म्हणाले, "अग्निवीर योजनेचं वास्तव मी सभागृहासमोर ठेवलं आहे. राजनाथ सिंह यांनी देखील त्यांची बाजू मांडली आहे. सत्य काय आहे ते देशाचं सैन्य आणि अग्निवीरांना माहित आहे. राजनाथ सिंह किंवा माझ्या बोलण्यामुळे काही फरक पडत नाही. सैन्याला आणि अग्निवीरांना माहित आहे की कोण खरं बोलतं आहे."
 
राहुल गांधी यांनी या प्रकारे मुद्दा मांडल्यावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उत्तर देण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, "हा गंभीर विषय आहे...राहुल गांधी यांनी म्हणाले की राजनाथ सिंह यांच्या बोलण्यानं काय फरक पडतो. विरोधी पक्षनेते अशा प्रकारे कसं काय बोलू शकतात. राहुल गांधी यांनी जे सांगितलं आहे त्याची खातरजमा केली पाहिजे."
 
नीट, शेतकरी आंदोलन आणि मणिपूरवरून सरकारवर हल्ला
राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना नीट परिक्षेत कथितरित्या पेपर लीक होण्याचा आणि मणिपूरचा मुद्दा देखील मांडला.
 
त्यांनी नोटबंदी आणि जीएसटी सारख्या सरकारच्या जुन्या निर्णयांसंदर्भात भाजपाची कोंडी केली.
 
ते म्हणाले, "नीट परीक्षा श्रीमंतांसाठी आहे. मी अनेक विद्यार्थ्यांशी बोललो. त्यांचं म्हणणं होतं की परीक्षेचा पॅटर्नच अशा प्रकारचा आहे की यामुळे फक्त श्रीमंतांचाच फायदा होतो."
 
याआधी ते म्हणाले होते की, "नीट परीक्षेवर दिवसभर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा होती.
 
हे खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. दोन कोटी तरुणांना याचा फटका बसला आहे. मागील सात वर्षांमध्ये 70 वेळा पेपर फुटीची प्रकरणं झाली आहेत. या विषयावर एक दिवसभर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा होती."
 
राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दादेखील उपस्थित केला. ते म्हणाले, "सरकार इतकं अहंकारी झालं आहे की त्यांनी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही एक मिनिटाचं मौन ठेवू इच्छित होतो. मात्र तुम्ही ते दहशतवादी असल्याचं म्हणत याला नकार दिला. सरकारनं अजूनसुद्धा किमान हमी भावाची (एमएसपी) कायदेशीर खात्री दिलेली नाही."
 
मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचार बाबत सरकारवर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की मणिपूरला सरकार भारताचा भाग मानत नाही.
 
राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान आणि गृह मंत्री मणिपूर बद्दल एक शब्द बोलत नाही. जणूकाही मणिपूर या देशाचाच भाग नाही. राजकारण आणि भाजपाच्या धोरणामुळे मणिपूर आगीत होरपळतं आहे. भाजपाने या राज्याला यादवीच्या उंबरठ्यावर उभं केलं आहे."
 
सोमवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवातच जोरदार गदारोळानं झाली. कामकाज सुरू होण्याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की स्थगिती प्रस्तावाला परवानगी देण्यात आलेली नाही. यानंतर सभागृहात गोंगाट माजला, घोषणाबाजी झाली आणि या गोंगाटातचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिलं की ते माईक बंद करत नाहीत.
 
ओम बिर्ला म्हणाले, अनेक माननीय खासदार सभागृहाबाहेर असा आरोप करतात की सभागृहाचे अध्यक्ष किंवा या आसनावर बसलेली व्यक्ती माइक बंद करतात...सभागृहाच्या अध्यक्षांमुळेच सभागृहात शिस्त राखली जाते. जिथं दुसरं नाव वापरायचं असेल तिथं दुसरं नाव दिलं जातं."
 
"आसन व्यवस्थेनुसार माइकचं नियंत्रण केलं जातं. सभागृहाच्या अध्यक्षांकडे माइकचं नियंत्रण नसतं...त्यामुळे माझं आग्रहाचं सांगणं आहे की कोणत्याही व्यक्तीनं सभागृहाच्या अध्यक्षांवर या प्रकारचा आक्षेप न घेणंच योग्य ठरेल. संविधानाची मर्यादा आपण पाळूया."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments