Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिराबेन यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी केली तेव्हा...

Prime Minister Narendra Modi's mother Hiraben passed away
, शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (11:55 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी (28 डिसेंबरला) त्यांची तब्येत खालावली होती आणि त्यांना अहमदाबागमधील केयून मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, “शंभर वर्षाचं आयुष्य आता ईश्वराच्या चरणी लीन झालं आहे. तिचा प्रवास एका तपस्वीसारखा होता. ती निष्काम कर्मयोगाचं प्रतिक होती आणि तत्त्वाशी एकनिष्ठ होती."
 
दरम्यान, हिराबेन यांनी 2002 सालीच एक दिवस नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होतील, असं म्हटलं होतं. गुजरातचे ज्येष्ठ पत्रकार भार्गव पारेख यांनी हिराबेन यांची तीनदा मुलाखत घेतली आहे. हिराबेन यांची मुलाखत घेण्याची संधी मिळालेल्या मोजक्या पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश आहे.
 
भार्गव पारेख यांनी 2002, 2012 आणि 2014 मध्ये हिराबेन यांची मुलाखत घेतली. बीबीसीशी संवाद साधताना ते म्हणाले, 2002 मध्ये मोदी विधानसभा निवडणूक लढवत होते, त्यावेळी त्यांना हिराबेन यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली.
 
हिराबेन त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या, "ए एक दिवस वडोप्रधान बनशे’ म्हणजे एक दिवस मोदी पंतप्रधान होतील."
 
गुजरातमधील आणखी एक पत्रकार देवसी बरड हेसुद्धा भार्गव पारेखच्या यांच्या या गोष्टीला दुजोरा देतात. 2007 मध्ये त्यांनी हिराबेन यांची मुलाखत घेतली होती.
 
हिराबेन यांनी सांगितलं होतं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, हे त्यांचं स्वप्न आहे, असं देवासी बरड म्हणतात.
 
हिराबेन यांनी त्यांना एक किस्सा सांगितला होतो. नरेंद्र मोदी लहान असताना त्यांच्या घरी एक साधू आला होता. नरेंद्र मोदी हे असामान्य व्यक्तिमत्व बनतील, असं तो म्हणाला होता. ते घर सोडून संन्यासी होतील, राजकारणात जातील आणि देश-विदेशात प्रसिद्धी मिळवील, असं तो साधू म्हणाला होता.
 
हिराबेन यांचं सुरुवातीचं आयुष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचा जन्म 18 जून 1923 रोजी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील विसनगर येथे झाला. हे गाव वडनगरच्या जवळ आहे. वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मूळ गाव आहे.
 
हिराबेन यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतरच काही लोकांना त्यांच्याबद्दल माहिती झाली आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातबाहेरील लोकांना त्यांच्याबद्दल काही गोष्टी कळल्या. हिराबेन या सत्तेच्या झगमगाटापासून दूर राहणारी व्यक्ती होत्या. नरेंद्र मोदी यांच्या ब्लॉगवरून हिराबेन यांच्याबद्दलची माहिती कळते. याशिवाय नरेंद्र मोदींवर काही पुस्तकं लिहिली गेली आहेत ज्यातून आपल्याला त्यांची आई हिराबेन यांच्याबद्दल काही माहिती मिळते. मोदींनी जून 2022 मध्ये हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त एक ब्लॉग लिहिला होता. त्या ब्लॉगमध्ये मोदींनी लिहिलं की, माझ्या आईला शाळेत जाता आलं नाही. तिला घरात सगळीकडे फक्त गरिबी आणि अभावच दिसला. माझी आई लहान असतानाच तिची आई वारली, त्यामुळे तिला आईचं प्रेम मिळू शकलं नाही.”
 
त्या काळात, अगदी लहान वयातच तिचे दामोदर दास मोदींशी लग्न झालं होतं. दामोदर दास कोणते काम करायचे किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन काय होते याबद्दल फारच कमी माहिती आहे. नंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे आणि मोदी स्वतः लहानपणी त्यांना मदत करायचे.
 
लग्नानंतर नरेंद्र मोदींचे आई-वडील वडनगरला स्थायिक झाले. दामोदर दास आणि हिराबेन यांना एकूण सहा अपत्य होती. ज्यात पाच मुले (सोमा मोदी, अमृत मोदी, नरेंद्र मोदी, प्रल्हाद मोदी, पंकज मोदी) आणि एक मुलगी वासंती मोदी यांचा समावेश होता. यापैकी नरेंद्र मोदी हे तिसरे पुत्र आहेत.
 
वडनगरमधलं घर अगदी छोटं होतं आणि हिराबेन यांना याच घरात त्यांच्या सहा मुलांना वाढवायचं होतं.
 
हिराबेन यांचा संघर्ष
आईच्या संघर्षाचा संदर्भ देत मोदी लिहितात, "घर चालवण्यासाठी दोन-चार पैसे जास्त मिळावेत म्हणून आई दुसऱ्याच्या घरची भांडी घासायची. वेळ काढून चरखा चालवत असे, कारण त्यातूनही काही पैसे मिळत असायचे.”
 
कापसापासून रुई काढण्याचं काम, रुईपासून धागा विणण्याचं काम, हे सगळं आई स्वतः करत असे. कापसाच्या सालीचे काटे आम्हाला टोचतील अशी त्यांना भीती होती."
 
आपल्या आईच्या जीवनशैलीचा संदर्भ देत मोदींनी लिहिलं की, त्यांची आई सुरुवातीपासूनच स्वच्छतेला महत्त्व देत असे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी ती स्वतः घराला सावरायची , घराच्या भिंतींवर काचेचे तुकडे चिकटवून आकार बनवायची.
मोदी त्याच ब्लॉगमध्ये पुढे लिहितात, "प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेची भावना तिच्या या वयातही तशीच आहे. आता गांधीनगरमध्ये माझ्या भावाचं कुटुंब आहे, माझ्या भाच्याचं कुटुंब आहे, तरीही स्वत:चं काम स्वत: करायचा ती प्रयत्न करते.”
 
नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचं 1989 मध्ये निधन झालं. त्यानंतर हिराबेन यांनी वडनगरचं घर सोडलं आणि त्यां धाकटा मुलगा पंकज मोदीसोबत गांधीनगर शेजारील रायसन गावात राहू लागल्या. पंकज मोदी हे गुजरात सरकारच्या माहिती विभागात काम करायचे आणि त्यांना सरकारी घर मिळालं होतं.
 
मोदींचं आईसोबत नातं
मोदींनी जूनमध्ये लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांच्या आईच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ते लिहितात, काही खाल्ल्यानंतर एखादी आई जसा आपल्या मुलाचं तोंड पुसते, त्याचप्रमाणे माझी आई अजूनही तसंच करते.
 
ते लिहितात, "जेव्हाही मी तिला भेटायला येतो, तेव्हा ती मला स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घालते. आजही माझी आई मला खाऊ घातल्यावर रुमालाने माझा चेहरा पुसते. ती नेहमी साडीत रुमाल किंवा छोटा रुमाल ठेवते.”
 
नरेंद्र मोदी यांनी वयाच्या 16-17 व्या वर्षीच घर सोडलं होतं. त्यांनी याबाबत हिराबेन आणि इतर कुटुंबीयांना याबाबत विचारणा केल्याचं पत्रकार देवसी बराड सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोदी लहानपणापासून कुटुंबातील घरच्या लोकांची सेवा करणे पसंत करत होते, असं त्यांचे कुटुंबीय सांगतात.
 
फ्रेंच लेखक सौन्तल देलोबेल आर्दिनो यांनी 'नरेंद्र मोदी: अ लाइफ फॉर इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की, वडनगरमध्ये 17 वर्षं राहिल्यानंतर मोदींनी जशोदाबेनसोबत संसार न करण्याचा आणि घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मते, नरेंद्र मोदींना अध्यात्म आणि ऋषी-मुनींच्या सहवासात रस होता.
हिराबेन यांचा हवाला देत त्यांनी या पुस्तकात आई आणि मुलामधील संवादाचा उल्लेख केला आहे. "आई, मुलगी आपल्या आई-वडिलांचे घर सोडून नवऱ्याच्या घरी जाते, अशी आपल्याकडे परंपरा आहे. माझ्या जाण्याकडेही तुम्ही असंच बघा आणि मी जे काही करेन ते देशासाठी करेन."
 
मोदींची आई पुढे सांगते, "घर सोडण्यापूर्वी तो दोन दिवस माझ्यासोबत राहिला. मी त्याच्या डोक्यावर टिळा लावला आणि त्याला काही पैसे दिले. तो घर सोडून गेला. त्यानंतर काही महिने मी दु:खात डुबून गेले होते.” 2001 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते तेव्हा हिराबेन दूर कोपऱ्यात बसल्या होत्या. त्या नरेंद्र मोदींची आई आहे हे फार कमी लोकांना माहिती होतं, असं भार्गव पारेख सांगतात.
 
2003 मध्ये जेव्हा हिराबेन पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक फॅमिली गेट-टू-गदर होता. मोदी हे 12 वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि या काळात हिराबेन एक-दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या.
 
सार्वजनिक जीवनापासून लांब
पंतप्रधान मोदी त्यांच्या ब्लॉगमध्ये आपल्या आईविषयी लिहितात की, "तुम्ही बघितलंच असेल, माझी आई कधीच कोणत्या सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासोबत सहभागी झालेली नाही. आत्तापर्यंत फक्त दोन वेळा असं झालंय की, ती माझ्या सोबत एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी आली असेल." त्या दोन कार्यक्रमांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, "एकता कार्यक्रमानंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून मीअहमदाबादला परत आल्यानंतर एका नागरी सन्मान कार्यक्रमात आईने मंचावर येऊन माझं औक्षण केलं होतं." ते पुढे लिहितात, "आणि मी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ती माझ्यासोबत आली होती. 20 वर्षांपूर्वी पार पडलेल्या त्या शपथविधी सोहळ्यानंतर ती कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली नाही."

मोदी आपल्या आईसोबत का राहत नाहीत?   
नरेंद्र मोदी 2014 मध्ये भारतच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि दिल्लीतच राहू लागले. मागचे आठ वर्ष ते भारताचे पंतप्रधान आहेत. या कार्यकाळात त्यांच्या आई एकदाच त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना भेटायला आल्या होत्या. खुद्द मोदींनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
 
मोदी आपल्या आईसोबत का राहत नाहीत असा प्रश्न फक्त सर्वसामान्यच नाही तर विरोधी पक्षातले लोक सुद्धा विचारतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांची आई त्यांच्या सोबत राहत नव्हती. त्या त्यांच्या धाकट्या मुलासोबत, पंकज मोदी यांच्यासोबत राहायच्या. पंकज मोदींचं निवासस्थान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून अगदी तीन-चार किलोमीटर अंतरावर होतं. 
 
या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
 
ही गोष्ट आहे 2017 च्या जानेवारी महिन्यातील. आपल्या आईला भेटण्यासाठी नरेंद्र मोदी गांधीनगरला गेले होते. योग सोडून आपल्या आईला भेटायला गेल्याचा फोटो मोदींनी ट्विटवर शेअर केला. आपल्या आईसोबत सकाळचा नाश्ता केला.
 
यावर केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले होते की, "मी माझ्या आईसोबत राहतो. मी रोज त्यांचे आशीर्वाद घेतो, पण या गोष्टींचा मी गवगवा करत नाही. राजकारण करायचं म्हणून मी माझ्या आईला बँकेच्या लाईनमध्ये उभं राहायला लावत नाही."
 
राजकीय फायद्यासाठी फोटो वापरल्याचे आरोप
 
आणि फक्त केजरीवालच नाही तर इतर अनेक लोकही मोदींवर राजकीय फायद्यासाठी आपल्या आईसोबतचे फोटो किंवा व्हिडिओ वापरल्याचे आरोप करतात. 
 
2017 मध्ये उत्तरप्रदेश निवडणुकीच्या फतेहपूर येथील प्रचारसभेदरम्यान मोदी म्हणाले होते की, त्यांची आई चुलीवर जेवण बनवायची. त्यांनी त्यांच्या वेदना पाहिल्या आणि अनुभवल्या होत्या.
 
यावर तुम्ही तुमच्या आईला सोबत घेऊन का राहत नाही असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला होता.
 
नोटाबंदीच्या काळात मोदींच्या आई बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या होत्या. यावरूनही केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, कधी रांगेत उभं राहायची वेळ आली तर मी स्वत: रांगेत उभं राहीन, पण आईला रांगेत उभं करणार नाही.
 
आपण आपल्या तिसऱ्या मुलासोबत का राहत नाही याचं उत्तर मोदींच्या आईने कधीच दिलं नाही. मात्र एका कार्यक्रमात खुद्द नरेंद्र मोदींनी त्याचं उत्तर दिलं होतं.
 
मोदींनी स्वतः दिलं होतं उत्तर
2019 मध्ये मोदींनी बॉलिवूड स्टार अक्षय कुमारला मुलाखत दिली होती, यावेळी त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता.
 
ती संपूर्ण मुलाखत अराजकीय होती. यावेळी अक्षय कुमारने मोदींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. 
सोबतच आई सोबत का राहत नाही हा प्रश्न देखील अक्षय कुमारने विचारला होता.
 
त्यावेळी मोदी म्हणाले होते की, मी लहान वयातच घर सोडून निघून गेलो. माझं आयुष्य पूर्ण वेगळं होतं.
 
मोदी पुढे म्हणाले की, "जर मी घरी असतो आणि मग पंतप्रधान बनलो असतो तर साहजिकच सगळ्यांनी माझ्या सोबत राहावं असं मला वाटलं असतं. पण मी अगदी लहान वयात घर सोडलं होतं, त्यामुळे ओढ, आसक्ती या गोष्टी माझ्या ट्रेनिंगच्या काळात मागे पडल्या. माझी आई म्हणते तुझ्या घरी राहून मी काय करणार, तुझ्याशी काय बोलणार."
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती, बहिणीवर प्रेम करणाऱ्याची भरदिवसा हत्या