27 नोव्हेंबर 2005 ची पहाट मुंबईकरांसाठी महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राच्या जाळपोळीनं उजाडली. या जाळपोळीची ठिणगी मटाच्या मुंबई आवृत्तीच्या पहिल्या पानावरील बातमीत होती.
या आठ कॉलमी बातमीचा मथळा होता – राज ठाकरेंचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र.
या बातमीपूर्वी खरंतर राज ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजीची चर्चा सुरू होती. त्यातही मालवण पोटनिवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे या चर्चांना आणखीच उधाण आलं होतं. पण मटानं या चर्चांना दुजोरा देणारी बातमीच छापल्यानं शिवसैनिकांमध्ये आगडोंब उसळला.
वरिष्ठ पत्रकार सचिन परब यांनी ही बातमी दिली होती. त्यांच्या या बातमीवर काही वेळातच स्वत: राज ठाकरेंनी शिक्कामोर्तब केला.
मटाच्या बातमीनंतर कृष्णकुंजबाहेर राजसमर्थकांची गर्दी जमा झाली होती. या गर्दीसमोर येत राज ठाकरे म्हणाले, “माझं भांडण माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे...”
राज ठाकरेंचं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदवलं गेलं. कारण याच वेळी राज ठाकरेंनी शिवसेनेच्या नेतेपदाचाही राजीनामा देऊन पक्ष सोडल्याचं जाहीर केलं.
हे जाहीर करत असताना समोरून घोषणा येत होत्या, राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं
राज ठाकरेंनी नवीन पक्ष स्थापन करण्याची कुठलीच घाई केली नाही. त्यांनी महाराष्ट्र दौरा केला आणि 9 मार्च 2006 रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नव्या पक्षाची – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची – घोषणा केली आणि पक्षध्वज जारी केला.
या घटनेला आज 18 वर्षे पूर्ण झाली. मात्र, यशवंतराव चव्हाण सेंटरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयापर्यंत मनसेला अद्याप उडी घेता आली नाहीय.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू पाहणाऱ्या राज ठाकरेंना 18 वर्षांनंतरही सत्तेचा सूर का गवसत नाहीय? असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या वृत्तलेखातून करणार आहोत.
तत्पूर्वी, मनसेच्या आणि पर्यायाने राज ठाकरेंच्या 18 वर्षांच्या प्रवासावर धावती नजर टाकूया.
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?
दहा वर्षांपूर्वी ठाकरे कुटुंबातील फुटीवर झेंडा नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अशा राजकीय फुटींचा कार्यकर्त्यांवर काय परिणाम होतो, असा एकूण सिनेमाचा विषय होता.
याच सिनेमात विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? अशा ओळींचं एक गाणं होतं. मनसेच्या कार्यकर्त्यांची मनोवस्था या गाण्यासारखी झालेली गेल्या 18 वर्षांचा इतिहास पाहता दिसून येते.
2006 साली पक्षानं घेतलेल्या भूमिका आता 18 वर्षांनंतर एकतर सौम्य रूप धारण करून शांत बसलेल्या दिसतात किंवा पडद्याआड जाऊन नव्या भूमिकांसह पक्ष पुढे चाललेला दिसून येतो.
पक्षास्थापनेनंतर मराठी अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंनी अजेंड्यावर घेतला. मराठी भाषेला दैनंदिन व्यवहारात प्राधान्य, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य इत्यादी मुद्द्यांसाठी प्रसंगी हिंसक आंदोलनं मनसेनं केली. पण मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमध्ये मर्यादित राहिलेल्या मनसेला टोलबंदी आंदोलनानं निमशहरापर्यंत पोहोचवलं.
मात्र, आंदोलन करून त्याचं श्रेय मिळेपर्यंतही थांबायचं नाही, अशी धरसोडवृत्ती मनसेची झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. परिणामी आंदोलनं शेवटापर्यंत मनसे नेत नाही, अशी प्रतिमा मनसेच्या आंदोलनांची होऊ लागली.
दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी पक्षाच्या वैचारिक भूमिकांमध्येही बदल करत नेले. मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक झालेले राज ठाकरे उत्तर भारतीय मंचाच्या व्यासपीठावर दिसू लागले. कधीकाळी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारे राज ठाकरे आता तर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचून भाजपच्या मदतीने धार्मिक राजकारणाची खेळी खेळू पाहतायेत.
निवडणुकानिहाय भूमिका बदलत गेल्याचं दिसून आलं. कधी शिवसेनेविरोधात मात्र भाजपच्या बाजूनं, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात, तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं, नि आता ठाकरे गटाच्या विरोधात नि भाजप-शिंदे गटाच्या बाजूनं... असा एकूणच गोंधळात टाकणारा नि भूमिकांची सातत्य गमावणारा प्रवास राज ठाकरेंनी गेल्या दीड दशकात केल्याचं ठळकपणे दिसून येतं.
एकेकाळी थेट 13 आमदार निवडून आणणाऱ्या राज ठाकरेंना गेल्या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे एक-एक आमदारच निवडून आणता आला, आणि तेही स्थानिक समीकरणांमुळे. राज ठाकरे किंवा मनसेची म्हणून तिथे ताकद किती उपयोगात आली, यावर राजकीय विश्लेषक प्रश्न उपस्थित करतात.
तरीही ज्यांनी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची खात्रीलायक बातमी स्वत: राज ठाकरेंच्या घोषणेआधी महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आणली, त्या वरिष्ठ पत्रकार सचिन परब यांना वाटतं की, “आजच्या राजकीय गोंगाटातही राज ठाकरेंचा आवाज क्षमतांनी भरलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अजेंडा ठरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे, पण क्षमता विसरून ते सत्तेच्या सावलीत जाऊन बसलेत.”
राज ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी नि त्यांची भाषणं ऐकण्यासाठी होणारी गर्दी मतांमध्ये का कधी परावर्तीत झाली नाही? राज ठाकरे आणि मनसेच्या कुठल्या गोष्टी सत्तेच्या सारीपाटावर मारक ठरल्या? आणि एकूणच, क्षमता असूनही सत्तेचा सूर का गवसला नाही, या प्रश्नांची एक एक करून उत्तरं जाणून घेऊ.
गेल्यावर्षी (9 मार्च 2023) मनसेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा प्रवास जवळून पाहणाऱ्या राजकीय विश्लेषकांशी बातचीत केली होती.
गर्दी मतांमध्ये परावर्तीत का होत नाही?
ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य म्हणतात, "राज ठाकरेंना पाहण्यासाठी-ऐकण्यासाठी आजही गर्दी आहे. ते कुठेही गेले तरी तुफान गर्दी होते. पण ही गर्दी मतांमध्ये परावर्तीत होण्यासाठी संघटना बांधणी नीट करावी लागते. या बाबतीत उद्धव ठाकरेंशी तुलना करता येऊ शकते. 40 आमदार सोडून गेले असतानाही केडर उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचं खेडची सभा सांगते. उद्धव करिश्मॅटिक नेता नसतानाही असं झालं. पण हे राज ठाकरेंबाबत होत नाही."
याचं कारण स्पष्ट करताना संदीप आचार्य म्हणतात की, “जनहिताची आंदोलनं करणं, धोरण सातत्य आणि पक्षबांधणी या तिन्ही बाबतीत राज ठाकरेंची कमतरता गेल्या दशकभरात ठळकपणे दिसून आली."
“फार मागे न जाता अगदी मागच्या निवडणुकीनंतरचंच पाहू. म्हणजे पाहा, मागच्या निवडणुकीत मोदीमुक्त भारताची घोषणा दिली. मात्र, ईडीच्या नोटिशीनंतर ते अगदी मोदींच्या सावलीत जाऊन बसलेत. लोक हे सर्व लक्षात ठेवत असतात. हेच आधीही झालं आणि लोकांनी लक्षात ठेवून मतपेटीतून व्यक्त केलं.”
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे हेसुद्धा संदीप आचार्य यांच्या पक्षबांधणीच्या मुद्द्याशी सहमत होतात.
अभय देशपांडे म्हणतात की, “मनसेची पक्षाची बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. म्हणजे पॉवर सेंटर तेच राहिले आणि खाली काहीच नाही. त्यात गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी पक्षाचं केडर उभं करावं लागतं. तसं काहीच झालं नाही. सुरुवातीच्या काळात आमदार निवडून आले, पण त्या आमदारांनी पक्षांतरं केली, तेव्हा कार्यकर्तेही गेले.”
शिवसेनेला पर्याय देण्याच्या उद्देशापलिकडे गेलेच नाहीत
राज ठाकरेंसाठी होणारी गर्दी आणि मनसेच्या मतांमधील फरक समजावून सांगताना ज्येष्ठ पत्रकार सचिन परब मनसेच्या स्थापनेच्या विश्लेषणातून समजावून सांगतात.
सचिन परब यांनी राज ठाकरे यांच्या नव्या पक्ष स्थापनेची बातमी ब्रेक केली होती आणि शिवसेना-मनसे या पक्षांच्या वाटचालीचे ते अभ्यासक आहेत.
मनसे शहरांच्या पलिकडे पोहोचली नाही, असं अनेकांचं असणारं मत सचिन परब खोडून काढतात आणि आपली मांडणी करतात.
सचिन परब म्हणतात की, “महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागातही मनसेचं नेटवर्क ताकदीनं होती. जिथं जिथं शिवसेना होती, तिथं मनसे पोहोचली होती. शहरांमध्येच मनसे होती, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. पण मनसेच्या यशाला जसे राज ठाकरे जबाबदार आहेत, तसेच मनसेच्या अपयशालाही तेच कारणीभूत आहे. कारण राज ठाकरे संघटनच बनवू शकले नाहीत.”
“संघटन बनवणं आणि ते संघटन चालवण्यासाठी व्यवस्था लागते, ते राज ठाकरे करू शकले नाहीत. सगळ्यात मोठं म्हणजे, निर्णय घेणारी व्यवस्था खालपर्यंत झिरपायला हवी होती. ती अजिबात झिरपली नाही,” असंही सचिन परब म्हणतात.
मनसेचं विश्लेषण करताना अनेक राजकीय विश्लेषक जे बोलणं टाळतात, त्याकडेच सचिन परब लक्ष वेधतात. तो मुद्दा म्हणजे राज ठाकरेंचा पक्ष स्थापन करण्याचा उद्देश, आताची स्थिती आणि त्यांचा स्वभाव.
सचिन परब म्हणतात की, “कोंडाळं करणं हा दोष सांगत राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. हेच दोष कमी कालावधीत मनसेत आले. पर्यायानं वेगळेपणा सिद्ध करण्यात अडचणी आल्या आणि त्यातच वाढ थांबली.”
“त्यात शिवसेनेला पर्याय द्यायचा, या चौकटीबाहेर मनसे गेलीच नाही. मुळात शिवसेनेची स्पेस किती, त्यात मनसेला स्पेस हवी होती. त्यामुळे मनसेला स्पेस उरलीच किती?” असा एक वास्तवाकडे लक्ष वेधणारा प्रश्न परब उपस्थित करतात.
इतरांच्या समीकरणांनुसार स्वत:चं स्थान ठरवत राहिल्यानं सातत्य गमावलं
सोशल मीडियावरील अनेक प्रतिक्रिया असो किंवा मनसेविरोधी राजकीय नेते, पक्ष असोत, अनेकजण राज ठाकरेंच्या राजकीय सक्रियतेतील सातत्यावर प्रश्न उपस्थित करतात, टीका टिप्पणी करतात तर कधी खिल्ली उडवतात. याबाबत राजकीय विश्लेषकांना विचारलं.
ते म्हणतात की, “मनसेच्या पर्यायानं राज ठाकरेंच्या भूमिकांमधील बदल (आयडियालॉजिकल शिफ्ट) बऱ्याचदा आणि तेही कमी कालावधीत बऱ्याचदा झाला. मराठीच्या मुद्द्यावरून मोदींना विरोध करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनं. कधी इकडे कधी तिकडे.
“इतकंच नाही, 2014 साली सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले, त्या निवडणुकीनंतर मनसे भाजपच्या बाजूला झुकत होती, तोच शिवसेना-भाजप एकत्र आले. पर्यायानं भाजपचा मार्ग बंद झाला. मग 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला आणि विधानसभेनंतर शिवसेनाच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. तिथेही मार्ग बंद झाले.”
अभय देशपांडे पुढे म्हणतात की, “इतर पक्षांच्या समीकरणांनुसार स्वत:चं स्थान ठरवत राहिले. स्वत:ची स्पेस शोधण्याचा प्रयत्न चुकीचा नाही, पण त्यात ते आतापर्यंत ठाम दिसले नाहीत.”
राज ठाकरेंच्या भूमिकांमध्ये सातत्य नसण्याची तुलना सचिन परब बाळासाहेब ठाकरेंशी करतात. ते म्हणतात की, “बाळासाहेब सुद्धा काही वैचारिक सातत्य राखणारे नव्हते. पण प्रस्थापितविरोधी हा त्यांच्या भूमिकांचा धागा राहिला. राज ठाकरे प्रस्थापित व्यवस्थांसोबत राहण्याचा प्रयत्न केला.
परब पुढे म्हणतात की, “बरं अशा भूमिका बदलण्यातही चूक नाही. राजकीय पटानुसार बदलल्या असतील. पण त्या भूमिका बदलताना कार्यकर्त्यांना पटवून देता आलं पाहिजे होतं. पण ते राज ठाकरेंना शक्य झालं नाहीय. म्हणून पक्षाचा जनाधार कमी होत गेला आणि गेल्या 17 वर्षात झालेल्या निवडणुकांमधून ते दिसून आलं.”
सध्याच्या राजकीय चित्रात मनसेचं स्थान काय नि भवितव्य काय?
आज (9 मार्च) मनसेला 18 वर्षे पूर्ण झाली. गेल्या दशकभरात महाराष्ट्रासह देशाचं राजकीय चित्र बदललंय. महाराष्ट्रात तर अभूतपूर्व घटना घडून राजकीय चित्र 360 अंशात बदललंय. या चित्रात मनसेचं आताचं स्थान काय आहे आणि त्याचा अर्थ काय, हेही समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
याबाबत अभय देशपांडे सध्याच्या समीकरणांचे अर्थ विशद करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की, “राज ठाकरे आता भाजपसोबत आहेत. एकनाथ शिंदेंशीही त्यांचं चांगलं जुळलंय. पण शिंदे गट-भाजपच्या युतीत मनसे असेल का? शिवसेनेचे मराठीबहुल गट आहेत, जिथे शिंदे गटाला पाय रोवता आला नाही, तिथं मनसेला उतरवायचं, असे प्रयत्न दिसतात. पण मनसेला थेट सोबत घ्यायचं की, त्यांच्या माध्यमातून हा डाव साधायचा, हेच भाजपकडून नीट स्पष्ट होत नाही. परिणामी मनसेची अवस्था ना विरोधात ना सत्तेत अशी आहे.
“दुसरीकडे, हिंदुत्त्वाच्या विचारांच्या मतांची जागा भाजपनं व्यापलीय, उरलेल्या हिंदुत्त्वाच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंचा गट आहे. अशावेळी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवर मतांची जागा उरली नाहीय. त्यात नवीन राजकीय जागा तयार करावी, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात उरली नाहीय. त्यामुळे राज ठाकरेंची अपरिहार्यताही आहे, हेही आपण मान्य करायला हवं.”
“मनसेचं भवितव्य हे स्वत:च्या जमेच्या बाजू किंवा कमतरतेच्या बाजू यांच्यावर अवलंबून असण्यापेक्षा इतर पक्षांची पावलं कशी पडतात, यावरच अवलंबून आहे,” असं अभय देशपांडे म्हणतात.
तर ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्यही अभय देशपांडेंच्या मताच्या जवळ जाणारं मतच व्यक्त करतात.
ते म्हणतात की, “सामान्यपणे सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष केला जातो. मात्र, अलिकडच्या काळात तर राज ठाकरे सातत्यानं सध्या सत्तेत नसलेल्या उद्धव ठाकरेंना निशाणा बनवतायेत. ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना फसवून पक्ष-चिन्ह सर्व हिसकावून घेतलं, त्यांच्यावर राज ठाकरे एक शब्दही बोलत नाहीत. सत्तेत नसलेल्या पक्षाचा हा अजेंडा असू शकत नाही. यातून पक्षाची वाढ कशी होणार?
“गॅस सिलिंडरचे भाव वाढतायेत, किंवा इतर मुद्दे असतील, त्यावर काहीच मनसे करत नाहीय. विरोधी पक्ष म्हणून यावर आंदोलनं करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांसोबत राहत असतील, तर लोकांनी गांभिर्यानं का घ्यायचं आणि लोकांनी आपलं का म्हणायचं? असंच चालत राहिलं तर उद्या एक आमदार तरी निवडून येईल का?”
“राज्यातल्या विरोधी पक्षाची स्पेस भरून काढेन, असं ते 2019 ला म्हणाले होते. पण आता काय करतायेत राज ठाकरे? अशा अधांतरी स्थानाची किंमत त्यांना आगामी निवडणुकीत चुकवावी लागेल. कारण अधांतरी असल्यानं कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. लढायचं नेमकं कुणाशी? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये दिसतो,” असं आचार्य म्हणतात.
तसंच, आपलं मत मांडताना सचिन परब राज ठाकरेंना मनसेच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, अशी अडचण सांगून आपलं म्हणणं संपवतात.
सचिन परब म्हणतात की, “इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये राज ठाकरेंची मोठ्या विजयाची क्षमता जवळपास संपलेली दिसते. किंबहुना, पाडण्याची क्षमताही क्षीण झालेली दिसते. शिंदेंच्या बंडानंतर तर मनसेला जी शिवसेनेची स्पेस मिळत असे, तीही संपलीय.”
18 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मनसेनं महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, आता दीड दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर मनसेलाच अजून आपला पाया नीट बांधता आला नसल्याचं निवडणुकांमधील आकडेवारी सांगते.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचा राजकीय पट बराच बदललाय. आता तर कधीकाळी विरोधक असणारे पक्ष सोबत आलेत, तर मित्र असणारे विरोधक झालेत. अशा सगळ्या सरमिसळ राजकीय घुसळणीतून राज ठाकरे आणि पर्यायानं मनसे आपली वेगळी वाट शोधत सत्तेचा सूर कसा शोधते, हे येणारा काळच ठरवेल.