"8 वर्षं देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावी लागली, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षं त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही," अशा शब्दांत केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवलाय.
द कश्मीर फाइल्स हा चित्रपट काही भाजपशासित राज्यात करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द कश्मीर फाइल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
केजरीवाल म्हणाले, "कााश्मीर फाइल्स चित्रपट तुम्ही टॅक्स फ्री करण्याची मागणी का करत आहात? तुम्हाला एवढंच जर वाटत असेल तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना सांगा, ते चित्रपट यूट्यूबवर टाकतील. मग सर्व लोकांना फुकट पाहता येईल. करमुक्त करण्याची गरजच काय?"
तसंच काश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे आणि भाजपावाल्यांना त्यांनी चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम दिलं आहे, असाही टोला केजरीवालांनी लगावलाय.
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजप आमदारांना 'आप'मध्ये सामील होण्याचं आवाहन केलं. "तुम्ही आमच्यासोबत या. आम्ही तुम्हाला 'द काश्मीर फाइल्स'सारख्या खोट्या चित्रपटांचे पोस्टर लावण्याचं काम देणार नाही. आम्ही तुम्हाला चित्रपटाचं प्रमोशन करायला लावणार नाही. चांगलं काम देऊ, जनतेच्या भल्यासाठीचं काम देऊ," असं केजरीवाल म्हणाले.