हिंदीच्या प्रचारास करूणानिधींच्या पायघड्या
चेन्नई , बुधवार, 3 फेब्रुवारी 2010 (19:30 IST)
आयुष्यभर हिंदीच्या नावाने बोटं मोडणा-या आणि हिंदी विरोधी वातावरण तापवत ठेवून त्यावर आपली राजकीय पोळी भजून घेणा-या तमीळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना आता उतारवयात हिंदीबद्दल प्रेम दाटून आले असून त्यांनी आपल्या राज्यात हिंदीचा प्रचार करण्यास आपला कधीही विरोध नव्हता असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात मराठी व अमराठी मुद्यावरून सुरू असलेला वाद आता दक्षिण भारतातही पोचला असून करुणानिधी यांनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना म्हटले आहे, की शिवसेना मराठी माणसाच्या हिताचा दावा करत असली तरीही त्यांच्या भूमिकेला राज्यात जनाधार नाही. देशात कुठलाही पक्ष इतक्या संकुचित विचारसरणीत राहू शकत नाही. दक्षिण भारतीय कधीही हिंदी विरोधी नव्हते आणि राज्यात हिंदीचा प्रचार करण्यास आपल्याला हरकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.करुणानिधी एकेकाळी हिंदीला विरोध करणारे सर्वांत मोठे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पक्ष व्यतिरिक्त दक्षिण भारतातील सर्वच पक्षांच्या राजकारणात हिंदी विरोध हा मोठा मुद्दा होता. मात्र आता ते हिंदीला पाठिंब्याच्या गोष्टी करू लागले आहेत.