नाशिक कुंभमेळ्यातील अतिशय महत्वाचा व वैशिष्ट्यपूर्ण मानला किन्नर आखाडा, नाशिक यांच्या वतीने तुळजाभवानी मातेची स्थापना करण्यात आली. किन्नर आखाडा उत्तर महाराष्ट्र चे महामंडलेश्वर संजना दीदी नंदगिरी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. नवरात्रीचे नऊ दिवस हा उत्सव संपन्न होणार आहे.
तुळजाभवानी मित्र मंडळ, उत्कर्ष नगर यांच्या विशेष सहकार्यातून येथील मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सप्तश्रृंगी गड वणी येथून पायी पेटती मशाल घेऊन भक्तांनी सेवा अर्पण केली असून हा दिवा नऊ दिवस सतत प्रज्वलित राहणार आहे. महामंडलेश्वर संजना दीदी स्वतः देवीच्या नऊ रुपांचा साज शृंगार करतात. त्यामुळे दररोज देवीचे रूप बघण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. हे देवस्थान जागृत व नवसाला पावणारे असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भक्त नवसपूर्ती करतात. कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसाद संपन्न होत असतो. नाशिकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्र उत्सव संपन्न होत असतात. त्यातील हा नवरात्र उत्सव भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे.