भारताच्या रमिता जिंदालने रविवारी इतिहास रचला. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे. त्याचबरोबर 20 वर्षांनंतर एका महिला खेळाडूने ही कामगिरी केली आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीत 20 वर्षीय रमिता 631.5 गुणांसह पात्र ठरली. ती पाचव्या स्थानावर राहिली. तिने सहा मालिकांमध्ये 104.3, 106.0, 104.9, 105.3, 105.3, 105.7 गुण मिळवले.
रमिता उद्या दुपारी एक वाजल्यापासून तिचा अंतिम सामना खेळणार असून सुवर्णपदकासाठी प्रयत्नात आहे. मनू भाकरनंतर पदक फेरी गाठणारी रमिता ही गेल्या 20 वर्षांत दुसरी महिला नेमबाज ठरली. रमिता तिच्या प्रशिक्षक सुमा शिरूर (अथेन्स 2004) नंतर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला रायफल नेमबाज आहे.