रस्त्यावर आणि इतरत्र प्लास्टिक आणि काचेच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लॅस्टिकचे रॅपर याच वस्तूमधून पैसे कमवण्याची संधी पुणे महापालिकेने दिलीय. महापालिकेने खाजगी कंपनीच्या सहकार्याने रिकाम्या बाटल्या आणि रॅपर्स गोळा करण्यासाठी स्वच्छ एटीएम मशीन्स बसविण्याची संकल्पना राबविली येत आहेत. यातून स्वच्छतेलाही हातभार लागणार असून नागरिकांनाही मोबदला मिळणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
हेमंत रासने यांनी सांगितले, की प्लॅस्टिक व काचेच्या बाटल्या, धातूचे कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर अशा पुनर्वापर होणार्या कचर्याचे संकलन करण्यासाठी शहराच्या विविध भागात स्वच्छ एटीएम मशिन्स बसविण्यात येणार असून, या मशिन्समध्ये बाटल्या आणि रॅपर्स टाकल्यानंतर नागरिकांच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ठरलेल्या दराप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. इकोमक्स गो (इं) ही स्टार्टअप कंपनी आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी ही मशिन बसविण्याच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
रासने म्हणाले, मपुनर्वापर होणारा कचरा या एटीएम मशिन्समध्ये संकलित केला जाणार आहे. त्यामुळे कचरा संकलनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी या मशिनमध्ये नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कचर्याचा कुठला प्रकार निवडायचा आहे त्याची माहिती द्यावी लागणार आहे. प्लॅस्टिकच्या एका बाटलीसाठी एक रुपया, काचेच्या बाटलीसाठी तीन रुपये, धातुच्या कॅनसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्लॅस्टिक रॅपर्ससाठी प्रत्येकी वीस पैसे जमा होणार आहेत.
रासने पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी ही मशिन्स बसविली जाणार आहेत त्यासाठी २४ तास मोफत वाय-फाय, नवीन बँक खाते उघडण्याची सोय, वीन सिम कार्ड खरेदी, सिनेमा, लोगल, रेल्वे, बसेसच्या तिकिटांची खरेदी, फी भरणे, पैसे पाठविणे अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एटीएममध्ये जमा होणार्या कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. एटीएमची उंची ६ फूट आणि रुंदी ४ फूट असणार आहे. या मशिनमध्ये तीन स्क्रिन असणार आहेत. पुढील स्क्रिनवर मशिन वापरणार्याची माहिती, महापालिकेच्या जाहिराती, अन्य कंपन्यांच्या जाहिराती असणार आहेत. दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली, वाराणसी या ठिकाणी या मशिन्स कार्यान्वित आहेत. पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दहा वर्षे मुदतीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत चाळीस मशिन्स टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत.
असे असतील दर
प्लास्टिक बाटली – १ रुपया, काचेची बाटली – ३ रुपये, टीनचे कॅन – २ रुपये, प्लास्टिक रॅपर – २० पैसे