मयांक भागवत
पुण्यात निर्बंध शिथिल झाले असले. तरी, मुंबईत दुकानं वगळता, मॉल्स आणि हॉटेल्सबाबत निर्बंध अद्यापही कायम आहेत.
राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आलेत. शॉपिंग मॉल सोमवारपासून (9 ऑगस्ट) लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आलीये. तर, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
कोरोना निर्बंध, लसीकरण आणि संभाव्य तिसरी लाट या मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी, (9 ऑगस्ट) कोव्हिड टास्कफोर्सच्या सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर निर्णय होणं अपेक्षित होतं. पण, कोणताही निर्णय झाला नाही.
मॉल्स उघडण्याबाबत आणि हॉटेल्सची वेळ वाढवून देण्याबद्दल सरकार निर्णय का घेत नाही? याचं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
मुंबईत मॉल्स, हॉटेल्स कधी उघडणार?
मुंबईत कोरोनासंसर्ग नियंत्रणात येत असल्याने, शहरातील दुकानं आठवड्याचे सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
लोकांची गर्दी टाळण्यासाठी, हॉटेल्स बंद होण्याची दुपारी चार वाजेपर्यंतची वेळ मात्र, महापालिकेकडून कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलमालक सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत.
दरम्यान, शहरातील मॉल्स, थिएटर्स आणि प्रार्थनास्थळं लोकांसाठी बंदच ठेवण्यात आली आहेत.
मुंबईचा कोरोना साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 0.04 टक्के आहे. तर, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 1680 दिवसांवर पोहोचलाय. मग, मॉल्स, हॉटेल्स आणि प्रार्थनास्थळं उघडण्याबाबत सरकार निर्णय का घेत नाही? हा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोव्हिड टास्कफोर्सच्या सदस्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत "येणाऱ्या काळात आणखी काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून निर्बंध कशा प्रकारे शिथिल करायचे यावर चर्चा झाली."
मुख्यमंत्री आणि टास्कफोर्सच्या बैठकीत कोणते निर्णय झाले. मॉल्स, हॉटेल्सना कोरोना निर्बंधातून दिलासा मिळणार का? याबाबत सरकारकडून ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
मात्र, येत्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय अपेक्षित असल्याची माहिती, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. इश्वरी प्रसाद सांगतात, "रुग्णसंख्या वाढेल ही भीती न बाळगता. रुग्णसंख्या वाढली तरी आरोग्यसुविधा पुरेशा आहेत का? यावर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. रुग्णसंख्या वाढली तरी, योग्य आरोग्यसुविधा पुरवता येणार असतील तर, सरकारने निर्बंध कमी केले पाहिजेत."
टास्कफोर्सच्या शिफारशी काय?
सरकारने मुंबईतील मॉल्स आणि हॉटेल्सबाबत निर्णय जाहीर केला नाहीये. पण, कोव्हिड टास्कफोर्सच्या सदस्यांनी सरकारला निर्बंध शिथिल करण्याबाबत काही शिफारसी दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबतच्या शिफासरी राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील."
टास्कफोर्सने राज्य सरकारला दिलेल्या शिफारशी,
हॉटेल्सना वेळ वाढवून देण्याबाबत हरकत नाही. पण, कोरोना नियमांचं पालन होणं गरजेचं आहे
शाळा सुरू करण्याचा निर्णय घाईने घेऊ नये. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता दिवाळीनंतर शाळा उघडण्याबाबत निर्णय घ्यावा
प्रार्थनास्थळं सध्यस्थितीत खुली करण्यात येऊ नयेत
ऑक्सिजन पुरवठा आणि निर्मिती यावर लक्ष द्यावं
शहरातील मॉल्स उघडण्याबाबत टास्कफोर्सच्या सदस्यांनी विविध मतं मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याची माहिती, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीये.
मुंबईत कोरोना निर्बंध शिथिल न करण्यामागे कारणं काय?
डॉ. सुहास प्रभू राज्य सरकारने स्थापन केलेल्या पिडिएट्रीक (लहान मुलं) टास्सफोर्सचे सदस्य आहेत.
मुंबईत कोरोना निर्बंध शिथिल न करण्यामागचं कारण काय? यावर बोलताना ते म्हणाले, "राज्यातील कोरोना निर्बंध घाईघाईने उठवण्याचा निर्णय न घेण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे, कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि रुग्णसंख्या वाढण्याची भीती."
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी, देशात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येईल. यासाठी आपल्याला तयार रहायला हवं, अशी सूचना केली होती.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासला होता. रुग्णांना बेड्स मिळत नव्हते. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणूनच, सरकार सरसकट निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेणार नाही.
जनरल फिजीशिअन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर मुंबईतील निर्बंध शिथिल न होण्यामागची 4 प्रमुख कारणं सांगतात.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती
मॉल्स आणि हॉटेल उघडल्यानंतर लोकांची गरज नसताना सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी
मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग पुन्हा हाताबाहेर जाण्याची भीती
मुंबईची लोकसंख्या आणि न पाळलं जाणारं सोशल डिस्टन्सिंग
तज्ज्ञ सांगतात, कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर लोकांची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. लोक नियमांचं पालन करता स्वैरपणे फिरत होते. लोकांनी नियमांचं पालन न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली.
डॉ. पाचणेकर पुढे सांगतात, "कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने घाईघाईने निर्बंध कमी करण्याचा किंवा मॉल्स उघडण्याचा निर्णय घेऊ नये. पुढील काही दिवस आपल्याला काळजी घ्यावी लागेल."
कोरोना लसीकरणात राज्य देशभरात पहिल्या क्रमांकावर असलं तरी, लसीकरणाचा वेग हवा तसा नाहीये.
लशीचा तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा येतोय. त्यामुळे, राज्यातील निर्बंध उठवताना राज्य सरकारला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. इश्वरी प्रसाद म्हणतात, "सरसकट निर्बंध उठवल्यामुळे लोकांची पुन्हा गर्दी वाढेल. यामुळे संसर्ग पसरेल अशी भीती सरकारला वाटते. त्यामुळे सरकार निर्बंध उठवत नाही."
सणासुदीच्या काळात निर्बंध घाला- केंद्र
केंद्रीय आरोग्यसचिव राजेश भूषण यांनी 4 ऑगस्टला राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं होतं. यात येणारे दिवस सणासुदीचे असल्याने राज्यांनी, काही निर्बंध घालावेत अशी सूचना केली होती.
केंद्रीय आरोग्य सचिव आपल्या पत्रात म्हणतात,
येणाऱ्या दिवसात मोहरम, ओणम, जन्माषटमी, गणेश चतुर्थी आणि दुर्गा पूजा यांसारखे सण आहेत
सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी उसळते
राज्यांनी लोकांची गर्दी कमी करण्यासाठी निर्बंध घालण्यावर विचार करावा
सार्वजनिक उत्सव आणि गर्दीचे कार्यक्रम कोरोनासंसर्ग पसरण्यासाठी सुपर स्पेडर मानले जातात.
तज्ज्ञ म्हणतात, केंद्र सरकारने निर्बंध सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध घालण्याची सूचना केली आहे. हे देखील एक प्रमुख कारण आहे, यामुळे राज्य सरकार मॉल्स आणि हॉटेल्सबाबत अजूनही निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेत नाहीये.
निर्बंध कमी करण्यासाठी दबाव?
राज्यातील कोरोना संसर्ग जास्त असलेल्या पुण्यासह 11 जिल्ह्यात लेव्हल तीनचे निर्बंध लागू आहेत. तर, राज्यातील इतर जिल्ह्यात निर्बंध कमी करण्यात आलेत.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील व्यापाऱ्यांनी निर्बंध शिथिल केले नाहीत. तर, दुकानं सुरू ठेवण्याची धमकी दिली होती. पुणे शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. मग, निर्बंध कायम का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर, पुणे शहरात निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.