Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सायरस मिस्त्री कार अपघातः घटनास्थळी पोहचले विशेष पथक, कळणार अचूक कारण

सायरस मिस्त्री कार अपघातः घटनास्थळी पोहचले विशेष पथक, कळणार अचूक कारण
, गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:54 IST)
ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातातील मृत्यूनंतर जगभरात त्याची चर्चा होत आहे. या अपघाताची मर्सिडीज कंपनीनेही गंभीर दखल घेतली आहे. हा अपघात का आणि कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी कंपनीचे विशेष पथक थेट जर्मनीहून भारतात दाखल झाले आहे. या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.  त्यानंतर अपघातग्रस्त कारची पाहणी केली आहे. हे विशेष पथक या संदर्भात लवकरच एक अहवाल तयार करणार आहे.
 
अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचा शोध विविध पातळ्यांवर घेतला जातोय. काही महत्त्वाच्या तपास संस्थांमार्फत चाचपण्या सुरु आहेत. अपघातावेळी सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमध्ये होते. नेमकी कुणाची चूक आहे, कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला की अन्य काही, याचा शोध सध्या घेतला जात आहे. भरधाव वेगातील ही कार दुभाजकावर जोरदार आदळली. डॉ. अनाहिता पंडोले (वय ५५ वर्षे) या कार चालवत होत्या. त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या बाजूला म्हणजेच समोरील सीटवर पती डेरियस पंडोले होते. पतीचे भाऊ जहांगीर दिनशा पंडोले आणि सायरस मिस्त्री मागील सीटवर बसले होते. अनाहिता आणि त्यांचे पती बचावले. गंभीर जखमी झाले तर सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. या दोघांनी सीटबेल्ट लावला नव्हता, असे म्हटले जात आहे.
 
अपघातातील कार ही मर्सिडीज बेंझ आहे. ती जर्मनीतली लक्झरी कार कंपनी आहे. कंपनीने या अपघाताची गंभीर दखल घेत विशेष पथक भारतात पाठविले आहे. घटनास्थळावरून गाडीचा पूर्ण डेटा कलेक्ट करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डेटा आधी पुणे आणि नंतर जर्मनीला पाठवला जाईल. आता पुढील तपासासाठी हा डेटा जर्मनीत डी कोड केला जाईल. त्यातून तांत्रिक माहिती उघड होईल. गाडीचे कोणते पॅरामीटर सुरु होते, कोणते बंद होते, हेही कळेल. या कारमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, स्टेअरिंग लॉक, चाकांमध्ये बिघाड, आतील एअरबॅग का उघडली नाही, आदी सर्व शंकांचे निरसन या डेटाद्वारे केले जाईल.
 
जर्मनीतील मर्सिडीजच्या प्लांटमध्ये डेटा डीकोड करण्याची सुविधा आहे. राज्य वाहतूक शाखेचे पोलीस मुंबई अहमदाबाद हायवेवर साइनेज, स्पीड लिमिट बोर्ड आणि स्पीड अलर्ट आहेत का, याचा तपास करेल. सूर्या नदीच्या पूलावर जिथे अपघात झाला, तिथे दिशादर्शक नसल्यामुळे थ्रीलेन ऐवजी टू लेन बनवण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. यासह ब्लॅक स्पॉटही शोधले जातील. राज्य वाहतूक दलाचे अतिरिक्त संचालक के. के. सारंगल म्हणाले, अपघात झाला, तिथे उजवीकडे वळण आहे. त्यामुळे तिथे वेगासंबंधी दिशा निर्देश गरजेचे होते. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणाचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग वाहतूक प्राधिकरणाला पाठवला जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसी विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती केली रद्द