पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान १०० वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या पायी दिंडीला पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आळंदी आणि देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी केली आहे. विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडला. आता विभागीय आयुक्त हा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदाय आषाढी वारीला परवानगी देण्याची मागणी करत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पंढरपूरच्या पायी वारीला अंशत: मान्यता देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक नुकतीच विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या समितीने वारकऱ्यांच्या सर्व सूचना ऐकून घेतल्या. आता समितीकडून एक अहवाल शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी सांगितले.यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली.