Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डीपीसी बैठकीत तडीपार अनधिकृत उपस्थिती; इसमावर गुन्हा नोंदवून जिल्ह्याबाहेर रवानगी

arrest
, मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (15:15 IST)
पुणे – कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अनधिकृतपणे उपस्थित राहिलेला तडीपार इसम प्रदीप बाजीराव जगताप (रा. सासवड) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. तसेच जगताप याची रवानगी जिल्ह्याबाहेर करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
 
तडीपार इसम प्रदीप बाजीराव जगताप राहणार जुने पोस्ट ऑफिस जवळ सासवड तालुका पुरंदर जि पुणे याला दौंड सासवडच्या प्रांताधिकाऱ्यांनी २९ जुलै २०२२ रोजी पुणे शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार केले होते. आदेश पारित केल्यानंतर प्रदीप बाजीराव जगताप यांनी २ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडे स्थगिती मिळण्याकरिता अपील दाखल केले आहे. परंतु हे अपील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असून स्थगिती मिळालेली नाही.
 
तडीपारीच्या आदेशाला स्थगिती मिळालेली नसताना काल (१७ ऑक्टोबर) जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन येथे सुरू असताना प्रदीप बाजीराव जगताप हा बैठक सुरू असलेल्या सभागृहात उपस्थित असल्याचे पोलिस अधीक्षक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत उपस्थित पुणे शहर पोलिस अधिकारी यांना कळवले. सासवड पोलीस ठाण्यामधून पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्के, पोलीस नाईक निलेश जाधव त्या ठिकाणी गेले. तोपर्यंत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी त्यांना ताब्यात घेतले होते. प्रदीप जगताप याला ताब्यात घेऊन त्यांना सासवड पोलीस स्टेशनला आणले. तडीपार कालावधीत कोणाच्या परवानगीने प्रवेश केला याबाबत विचारपूस केली असता कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
 
प्रदीप बाजीराव जगताप यांनी तडीपार असताना कुठल्याही प्राधिकार्‍याची परवानगी न घेता पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजे पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्यावर सासवड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे तसेच त्याची रवानगी जिल्ह्याबाहेर करण्यात आली आहे. सदरचा तडीपार कालावधी हा ६ महिने आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता व्हॉट्सअॅपमध्ये मेसेज एडिट करू शकणार