पिंपरी चिंचवड : पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये दि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीच्या घरी ईडीने छापेमारी केली असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईमध्ये ईडीला भलेमोठे घबाड हाती लागले आहे. अमर मुलचंदानी यांच्या घरी २ कोटींचे हिरे आणि रोख रक्कम ईडीला सापडली आहे. याचबरोबर ४ आलिशान कार देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये इडी कडून सुरू असलेल्या छापेमारी दरम्यान दि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीसह त्यांच्या कुटुंबातील ६ सदस्यांविरोधात तपास कामात अडथला निर्माण करणे तसेच लपून बसून नियमबाह्य कर्ज प्रकरणातील पुरावे नष्ट केल्या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाई दरम्यान, मुलचंदानीच्या घरी इडीला मोठे घबाड सापडले आहे.
सुमारे २ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याच्या दागिन्यान बरोबरच लाखो रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. त्याच बरोबर ४ आलिशान कार देखील जप्त केल्या असल्याची माहिती इडीकडून देण्यात आली आहे. तर ईडीच्या सर्च ऑपरेशन सुरू असताना घरातच लपून बसलेल्या अमर मुचंदाणी याने मोबाईलमधील पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी इडीकडून तक्रार देण्यात आल्यानंतर अमर मुलचंदाणी आणि त्याच्या कुटुंबातील ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पिंपरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पिंपरी स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. तर मुख्य आरोपी अमर मुलचंदानी हे वैद्यकीय कारणास्तव ससूनमध्ये पोलिसांच्या निगराणीत उपचार घेत आहे. गुन्हे दाखल असलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा देखील समावेश असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ईडीचे सहायक संचालक सुधांशू श्रीवास्तव यांनी स्वतः याप्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अशोक साधुराम मुलचंदानी, सागर मनोहर मुलचंदानी, मनोहर साधुराम मुलचंदानी या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. छापेमारी दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी घरामध्ये प्रवेश केल्यावर सुमारे साडे आठ तास अमर मुलचंदाणी हा वरील मजल्याच्या खोलीमध्ये लपून बसला होता आणि अनेक पुरावे नष्ट केल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या कारवाई दरम्यान मुलचंदाणी याच्या तीन आलिशान कार आणि अनेक कागदपत्र ईडीने जप्त केल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor