पुण्यात फार्मासिस्टच्या उपस्थितीत नसताना औषधांची विक्री करणाऱ्या 34 दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे.या 34 दुकानांना एफडीए (FDA) ने टाळे ठोकले आहे. एफडीएने केलेल्या तपासणीच्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक औषध दुकानांना स्टॉप सेलची नोटीस बजावण्यात आली असून पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
औषध दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीत औषध विक्री होते का, हे तपासण्यासाठी एफडीएने मागील महिन्यापासून राज्यभरात मोहिम राबवली आहे. त्याअंतर्गत पुणे विभागात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील 722 औषध दुकानांची तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान 688 दुकानांमध्ये फार्मासिस्ट उपस्थित होते. परंतु 34 दुकानांमध्ये फार्मासिस्ट उपस्थित नसताना औषध विक्री सुरु असल्याचे आढळून आले. यापैकी 34 दुकानांना स्टॉप सेलची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती एफडीए पुणे विभागाचे सहआयुक्त (औषध) एस. बी. पाटील यांनी दिली.
पुणे विभागात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये सर्वाधिक औषध दुकानांची तपासणी पुणे जिल्ह्यात करण्यात आली. पुण्यात तपासण्यात आलेल्या 311 दुकानांपैकी 14 ठिकाणी फार्मासिस्ट उपस्थित नव्हते. त्यामुळे या दुकानांना स्टॉप सेलची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
औषध दुकानांमधून औषधांची विक्री होत असताना त्या ठिकाणी फार्मासिस्ट असणे आवश्यक आहे. औषध दुकानात फार्मासिस्ट आहे की नाही याची अचानक तपासणी करणार आहे. फार्मासिस्ट नसलेल्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे फार्मासिस्टच्या उपस्थितीतच औषधांची विक्री करावी, असे पाटील यांनी सांगितले.
एफडीए कारवाई
जिल्हा – औषध दुकाने – फार्मासिस्ट होता – फार्मासिस्ट नाही – टक्केवारी
पुणे – 311 – 297 – 14 – 5
सोलापूर – 108 – 105 – 3 – 3
कोल्हापूर – 106 – 97 – 9 – 8
सातारा – 139 – 135 – 4 – 3