पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये आजपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत सासवड पूर्णपणे बंद राहणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सासवडकरांनी जनता कर्फ्यूची मागणी प्रशासनाकडे केली होती. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आजपासून जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुणे जिल्ह्यात बारामती, वाघोली, भोरनंतर सासवडमध्येही जनता कर्फ्यू करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 239481 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 154441 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या जिल्ह्यात 80152 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 4888 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.