आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक, पीयूसी परवाना, शिधापत्रिका, वीज बिल अशा महत्वाच्या कागदपत्रांसोबतच, आता पुणेकर नागरिकांना मांजर पाळत असल्यास पाळीव प्राणी परवाना देखील सांभाळावा लागणार आहे. बऱ्याचशा घरातून आवडीनं मांजर पाळली जाते, मांजरीची लहान पिल्लं तर घरातल्या लहानग्यांसह घरी आलेल्या पाहुण्यांनादेखील हवीहवीशी वाटतात.
या मांजरीचे लाडदेखील कौतुकानं केले जातात. अगदी आमच्या मांजरीशी तुमची मांजर भांडते या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्येदेखील भांडणाचे प्रसंग उद्भवतात, अशा या लाडक्या मांजरीला पाळण्यासाठी आता मांजरांची नोंदणी करावी लागणार असून यासाठी वार्षिक शुल्क रक्कमेसोबतच, मांजरीचं रेबीजप्रतीबंधक प्रमाणपत्र, मांजराचा फोटो, स्वतःचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात असणार असल्याचं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कळवलं आहे. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ही म्हण तर प्रचलित आहेच, पण आता घंटा नाही मात्र मांजरीचा परवाना मात्र नक्कीच काढावा लागणार.
Edited by : Ratnadeep Ranshoor