Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजारपणासाठी जेलबाहेर, ससूनमधून ड्रग्जचं रॅकेट आणि 2 कोटींचं ड्रग्ज घेऊन हॉस्पिटलमधून पसार

Webdunia
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (23:20 IST)
एखाद्या प्रकरणात अटक असलेला आरोपी येरवडा जेलमधून आजारपणाच्या नावाखाली बाहेर पडतो आणि त्यानंतर ज्या आरोपासाठी अटक झाली आहे ते अंमली पदार्थांचे रॅकेट उघडपणे चालवतो.
इतकंच नाही तर रुग्णालयातच पुरवण्यासाठी अंमली पदार्थ मागवतो आणि हे उघडकीला येतं तेव्हा चक्क रुग्णालयातून पळूनही जातो! सिनेमातली वाटावी अशी घटना घडली आहे पुण्यामध्ये.
 
हा सगळा प्रकार उघडकीला आला तो बंदोबस्त करणाऱ्या एका पोलिसामुळे. पुण्यातल्या ससून रुग्णालया पासून काही अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.
 
या परिसरात 30 सप्टेंबरला एका हवालदाराला एक माणूस पाठीवर बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरत असलेला दिसला. संशय आल्याने हवालदाराने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आणि या चौकशी दरम्यानच त्याच्याकडे तब्बल 2.14 कोटी रुपयांचे 1.71 किलो मेफ्रेडोन किंवा एमडी ड्रग सापडले.
 
या आरोपी सुभाष मंडलकडे हे ड्रग कुठे घेऊन चालला होता याची चौकशी केल्यावर त्याच्याकडून रुग्णालयात दाखल असलेल्या ललित पाटीलचं नाव पोलिसांना कळालं.
 
चक्क ससून रुग्णालयातून कैदेत असलेल्या आरोपीकडून अंमली पदार्थांचं रॅकेट चालवलं जात असल्याचं उघड झालं.
 
कोण आहे ललित पाटील
या प्रकरणातला मूळ आरोपी 34 वर्षांचा ललित पाटील मूळचा नाशिकचा. 2020 मध्ये त्याला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अटक झाली. ते प्रकरण देखील गाजलेलंच.
 
कोरोना काळात देखील त्याच्याकडून अंमली पदार्थांची तस्करी होत होती. या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 किलो एमडी ड्रग पकडले होते. त्यातून एमडी ड्रगचे मोठे रॅकेट उघडकीला आले होते. यातला मुख्य आरोपी होता छोटा राजन गँगशी संबंधित असणारा 42 वर्षांचा तुषार काळे.
 
काळेने अंमली पदार्थांच्या व्यवसायाला सुरुवात केली ती एका खूनाच्या प्रकरणातून बाहेर आल्यावर.त्याने जेल मधल्याच ओळखीने अंमली पदार्थांचा व्यवयास सुरु केला. त्यातून थेट एका नायजेरीयन नागरिकाच्या तो संपर्कात आला. या नायजेरीयन नागरिकाने त्याला भानूदास मोरेशी गाठ घालून दिली
 
मोरे तेव्हा ठाण्याच्या तुरुंगात होता आणि काळे त्याला कोर्टाच्या तारखांदरम्यान कुटुंबाचा सदस्य म्हणून भेटायचा. मोरेच्या मदतीने काही लोकांशी संपर्क करत काळेने अंमली पदार्थांच्या धंद्यात जम बसवला.
 
तंत्र कळल्यानंतर काळे राजगुरू नगर मधल्या एका कंपनीच्या संपर्कात आला आणि तिथे त्याने विक्रीच्या ऐवजी दर किलोचे भाडे घेऊन त्याबदल्यात अंमली पदार्थ पुरवायचा व्यवसाय सुरु केला. याच प्रकरणात ललित पाटील त्याची साथ देत होता.
 
ललित पाटीलला अमली पदार्थांचा पुरवठाच नाही तर ते तयार करण्याचं तंत्र देखील चांगलंच ज्ञात होतं. काळेला अटक झाल्यानंतर पोलिसांना सापडलेल्या 1 कोटी रुपयांमधले 25 लाख रुपये पोलिसांनी ललित पाटीलच्या नाशिकच्या घरातून ताब्यात घेतले होते.
 
दहावी पर्यंतचं शिक्षणही पूर्ण न केलेल्या ललित पाटीलची मुळची आर्थिक पार्श्वभूमी देखील श्रीमंतीची नाही. मात्र अचानक त्याच्या कडे आर्थिक सुबत्ता इतक्या प्रमाणात आली होती की तो वेगवेगळ्या हाय एंड गाड्या वापरत होता.
 
या प्रकरणात 2020 मध्ये ललित पाटीलला अटक झाली. त्यानंतर तो येरवडा जेल मध्ये कैदेत होता. पण गेले चार महिने तो सातत्याने विविध आजारांची कारणे देत ससून रुग्णालयाच्या वाऱ्या करत होता. दर वेळी त्याचे आजार देखील बदलत होते आणि त्यामुळे ससून मधला मुक्काम देखील लांबला होता.
 
येरवड्यामधून पाटीलला ससून रुग्णालयात आणलं गेलं ते टीबीच्या उपचारांसाठी. मात्र त्यानंतर त्याच्यावर हर्नियाचेही उपचार करण्यात आले. सध्या अल्सरच्या त्रासासाठी तो ससून मध्ये दाखल होता आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार होती.
 
कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहिती नुसार त्याचं हे वारंवार रुग्णालयात दाखल होणं आणि तिथला वाढता मुक्काम यावर तुरुंग प्रशासनाने आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतर देखील ललित पाटील तब्बल चार महिने रुग्णालयात होताच.
 
कसं चालवत होता रॅकेट?
ललित पाटीलने ससून रुग्णालयात गेल्यावर दोन आयफोन मिळवले होते. पोलिसांच्या मते यातल्या एका फोनची किंमत 1.1 लाख रुपये आहे. याचाच वापर करुन तो हे रॅकेट चालवत होता. हे अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी त्याने रऊफ रहिम शेखला (वय 19) हाताशी धरले होते. शेखच्या माध्यमातून ससूनमधून तो अंमली पदार्थ पुरवायचा. या शेखकडेच हे पदार्थ पोहोचवण्यासाठी मंडल ते घेऊन जात होता.
 
हा प्रकार उघड झाल्यानंतर पाटील राऊफ आणि मंडल विरोधात पुण्यातल्या बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये कलम ३०६/२०२३ आणि एन पी डी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
1 तारखेला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तारखेला शस्त्रक्रिया करायची असल्याने ललित पाटील रुग्णालयातच मुक्कामी होता. शस्त्रक्रीयेच्या आदल्या दिवशी एक्स रे काढण्यासाठी त्याला एक पोलिस हवालदार ससून रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर घेऊन आला आणि त्यावेळी पोलिसाच्या हाताला झटका देऊन पाटील तिथून फरार झाला.
 
ससून बाहेर येत त्याने रिक्षा पकडल्याचे त्याला आणलेल्या पोलिसाने जबाबात म्हणले आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, "पोलिसांच्या विविध तुकड्या त्याचा शोध घेत आहेत. तो रुग्णालयात असल्याने आणि तिथून फरार झाल्याने तो हे अंमली पदार्थांचे रॅकेट कसे चालवत होता याबाबत चौकशी करण्यात येत आहे."
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ससूनमध्ये पोलिस निरिक्षकांसह जवळपास 112 गार्ड ड्युटीवर असतात. त्यांच्याक़डे या कैद्यांच्याच वॉर्डची देखरेख करण्याची जबाबदारी असते.
 
चाकण प्रकरणातील सरकारी वकील शिशिर हिरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "या प्रकरणी यापुर्वीच कोर्टासमोर कोर्टाने दखल देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.हा प्रकार म्हणजे कायद्याची चेष्टा असल्याचं सांगत मी कार्यवाही करावी अशी विनंती केली होती. आता झालेला प्रकार लक्षात घेता यातील सर्व संबंधित दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे."
 
या प्रकरणी हलगर्जीपणा झाला म्हणून आता 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करणार -राहुल गाँधी

अमित शहांनी केला भाजपचा जाहीरनामा जाहीर

महाराष्ट्रात महाआघाडीला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार शरद पवार म्हणाले-

Donald Trump: डोनाल्डट्रम्प यांनी सात स्विंग राज्य जिंकून इतिहास रचला

पाकिस्तान दौऱ्यासाठी बीसीसीआयला भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही?

पुढील लेख
Show comments