वीजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्री शहराला पुन्हा अक्षरशः बुडविले. पुणे शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते.रस्ते तुंबले होते. घरात पाणी शिरले होते. पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली.
पावसाचा जोर इतका भयंकर होता की, सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. 80 ते 130 मिलिमीटर पाऊस पुण्यात नोंदला गेला.
मुसळधार पावसाने कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर भागातील नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, रस्त्यांची स्थितीही भयानक झाली होती.
या भागातून रात्री 12 वाजेपर्यंत 25 हून अधिक कुटुंबीयांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून मदतीची याचना केली.
मध्यवर्ती भागात नागझरी नाल्याचा मोठा पूर आला, बुरूड पूल येथे पाणी पात्राच्या बाहेर आल्याने परिसरातील वस्तीमध्ये पाणी घुसले होते. तर मंगळवार पेठेतही शिवाजी आखाड्याच्या शेजारील वस्तीमध्ये पाणी घुसल्याने अग्निशमल दलाचे जवान मदतीसाठी आले.त्यांनी घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली.
शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, स्वारगेट, कात्रज, कर्वेनगर, तसेच पिंपरी- चिंचवड या भागात घरात पाणी शिरले.