मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या रविवारी पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी ही सभा होणार आहे. या सभेचा दुसरा टीजर मनसे कडून जाहीर करण्यात आला आहे.
मनसे कडून जाहीर करण्यात आलेल्या या टीजर मध्ये राज ठाकरे यांच्या आधीच्या भाषणातील वाक्य घेण्यात आले आहे. 'मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे, माझा कुणाच्या ही प्रार्थनेला विरोध नाही पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका',''रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता कुणी दिले हे अधिकार तुम्हाला, अजून मी भात्यातील बाण काढला नाही आणि तो मला काढण्यास भाग पाडू नका.'' असं ते या टीजर मध्ये म्हणताना दिसत आहे. मनसेचा हा टीजर पाहून आता या सभेत काय गर्जना होणार या कडे लक्ष लागून आहे.
राज ठाकरे यांची पुण्यातील ही सभा होणार की नाही अशी चर्चा सुरु होती. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून डेक्कन परिसरातील भिडे पुला नजीक असणाऱ्या नदीपात्रातील सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र पावसाची शक्यता आणिक खराब हवामानामुळे नदीपात्रातील सभा रद्द करण्यात आली होती. आता स्वारगेट्च्या गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी राज ठाकरेंची सभा उद्या होणार आहे.
राज ठाकरे यांचा बहुचर्चित राम जन्मभूमी-अयोध्येचा 5 जूनचा नियोजित दौरा स्थगित करण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्वीची भूमिका पाहता राज यांच्या दौऱ्यास उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन भाजपनेच राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर लक्ष्मणरेषा आखून रोखले असल्याचे वृत्त आहे.आता यांचं आपल्या भाषणातून राज ठाकरे समाचार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.