पुण्यात राहणाऱ्या एका जोडप्याला जेव्हा त्यांच्या पाळीव कुत्र्याला झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पळवून नेल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कुत्रा त्यांना खूप प्रिय आहे आणि त्याच्या हरवल्याची बातमी कळताच त्यांनी त्याच्या शोध घेताना रात्रंदिवस एक केले. पुण्यातील वंदना साह यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकून या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी डिलिव्हरी बॉयसोबतच्या त्यांच्या पाळीव कुत्र्याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे.
वंदना यांनी लिहिले की, सोमवारी त्यांचा डोट्टू नावाचा पाळीव कुत्रा घराबाहेर खेळताना सीसीटीव्हीमध्ये शेवटचा कैद झाला होता. अचानक बेपत्ता झाल्यानंतर वंदना आणि त्यांच्या पतीने त्यांच्या कुत्र्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. शेजाऱ्यांना विचारूनही काहीच सुगावा लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि या प्रकरणाचा तपास करण्याचे आवाहन केले.
वंदना यांनी सांगितले की त्यांच्या घराभोवती बरेच डिलिव्हरी बॉईज येत जात असतात. अशात जेव्हा त्यांनी त्यांच्या कुत्र्याचा फोटो दाखवला तेव्हा एका मुलाला ओळख पटली आणि त्याने सांगितले की झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय त्यांच्या कुत्र्याला घेऊन गेला आहे. कुत्र्याला पकडून नेणार्या मुलाचे नाव तुषार असे आहे.
वंदना यांच्याकडून तुषारचा नंबर घेऊन त्याला कुत्र्याबद्दल विचारले असता तो घाबरला आणि बहाणा करू लागला. त्याने सांगितले की तो कुत्रा मी त्याच्या गावातून आणला आहे. आणि वंदना शोधत असलेला कुत्रा तो नव्हे. वंदना यांनी आपला कुत्रा परत मिळवण्यासाठी त्याला पैशाचे आमिषही दाखवले तरीही त्याने ते मान्य केले नाही आणि फोन बंद केला.
याबद्दल वंदना यांनी झोमॅटोकडे तक्रार केली आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. यानंतर झोमॅटोने तुषारकडून वंदना यांचा पाळीव कुत्रा घेतला. वंदना यांचे ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.