रक्षा बंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे.हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे. हा सण श्रावणात साजरा केला जातो.श्रावण महिना हा हिंदू धर्मात शुभ मानला आहे.
हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे.या दिवशी भाऊ बहीण नवे कपडे घालतात आणि बहीण भावाला पाटावर बसवून भावाच्या कपाळी टिळा लावते.मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि आरती ओवाळते.मिठाई खाऊ घालते.आणि बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते.भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतात.आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतात.
बाजार पेठेत वेगवेगळ्या रंगाची आणि डिझाईनच्या राख्या मिळतात.राखीचा सण चुलत भाऊ,मावस भाऊ,मामे भावासह देखील साजरा करतात.या दिवशी घरात सर्व कुटुंबीय एकत्र येऊन सण साजरा करतात.
या सणाची एक आख्यायिका आहे की, देवासूर संग्रामात देवांचा विजय व्हावा या साठी इंद्राणीने इंद्राच्या हाताला राखी बांधली होती.अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती.
'' स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.
समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे.