Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रमजानमधील पदार्थांचा वाद : 'एखाद्याला हवं ते खाऊ न देणं ही हिंसाच'

Webdunia
मंगळवार, 19 मार्च 2024 (18:36 IST)
-चिन्मय दामले आणि हारून शेख
1933 सालच्या मार्च महिन्यात महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या वर्तमानपत्रात एक रंजक लेख छापून आला होता. हा लेख होता जिलबीबद्दल. जिलबी हे पक्वान्न गेल्या दहा वर्षात पुण्यात अतिशय लोकप्रिय झालं आहे; श्रावणात, लग्नांत, आणि मुंजींमध्ये जिलबीच असते. त्यामुळे इतर गोड पदार्थ रांधले जात नाहीत, अशी तक्रार त्या लेखात होती.
 
एकच एक पक्वान्न खाऊन लोकांना कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, कडबु, घीवर, दूधपाक अशा मिठाया सणासमारंभात कराव्यात, अशी अपेक्षा लेखकानं व्यक्त केली होती.
 
पण लेखकाची जिलबीबद्दल खरी तक्रार वेगळीच असावी!
 
‘नवीन राजवटीत पाश्चात्यांची नवीन खाद्ये आपल्याला येऊन मिळाली, तर त्याने विशेष नुकसान झाले नाही. परंतु प्रांताप्रांताच्या उत्पन्नाच्या, हवामानाच्या सोयीने निर्माण झालेली व अगदी आजतागायत मान्यता पावलेली खऱ्या अर्थाने देशी व रुचकर पक्वान्ने जिलबीसारख्या परप्रांतात निर्माण झालेल्या वस्तूपुढे मागे पडावी हे इष्ट नव्हे,’ असं त्याचं म्हणणं होतं.
 
रमजानमधील खाद्यपदार्थांच्या वादाचं मूळ
गेल्या आठवड्यात फेसबुकवरच्या एका पाकसमूहात घडलेल्या काही घडामोडींमुळे नव्वद वर्षांपूर्वीचा हा लेख आठवला.
 
सध्या रमझानचा महिना सुरू आहे. त्या निमित्तानं इफ्तारसाठी रांधल्या जाणाऱ्या पदार्थाच्या कृती, फोटो पोस्ट करण्याचं आवाहन या समूहाच्या संचालकांनी केलं.
 
वेगवेगळ्या ऋतूत, सणांच्या वेळी तिथे अशी आवाहनं नेहमीच केली जातात. यावेळी मात्र हलव्याची एक कृती आल्यावर काही सदस्यांनी पोस्टकर्तीला ट्रोल केलं. नंतरही रमझान असा हॅशटॅग दिसताच ट्रोलिंग सुरू राहिलं.
 
अनेकांनी सभ्य भाषेत ‘त्यांच्या’ सणाचे पदार्थ नकोत, असं सांगितलं. एका हिंदू समूहात रमझान साजरा केला जाऊ नये, असं ट्रोल करणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं. ही चर्चा पुढे इतर समाजमाध्यमांवर सुरू राहिली.
 
‘जाळणारा महिना’
रमजान हा मुस्लिम चांद्रवर्षातला नववा महिना. सर्व महिन्यांत मुसलमानांसाठी हा महिना अत्यंत पवित्र असतो. 'रमजान' या अरबी शब्दात 'रम्ज' हा धातू आहे. 'रम्ज' म्हणजे जाळणारा किंवा अतिशय उष्ण.
 
पैगंबर मोहम्मदांपूर्वी अरब लोक ज्यू लोकांचं अनुकरण करून चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यांच्यात ताळमेळ बसवण्यासाठी ठराविक काळाने एक ‘अधिक मास’ त्यांच्या चांद्रवर्षात अंतर्वेशीत (Intercalation) करीत असत. या पद्धतीला 'अल्-नासी' (पुढे ढकलणे) असं म्हणत असत. तेव्हा 'रमजान' अरबस्तानातल्या उन्हाळ्यात (जून-जुलै) दरम्यानच येत असे.
 
वाळवंटातील उन्हाळ्यातला आणि त्यामुळे अतिशय उष्ण महिना म्हणून तो 'जाळणारा महिना' असं त्याचं सार्थ नाव होतं.
 
म्हणून रमजान सर्व ऋतूंमध्ये येतो
इ. स. 622 मध्ये पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या अनुयायांनी मक्केतील छळाला कंटाळून मदिना शहरी स्थलांतर केले (हिजरत). त्या घटनेपासून इस्लामी हिजरी कालगणनेचा प्रारंभ झाला. त्यानंतरही 'अल्-नासी' पद्धत अंमलात होती.
 
प्रेषित मोहम्मद यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दिलेल्या शेवटच्या प्रवचनात इस्लामी कालगणनेत 'अधिक मास' अथवा 'अल्-नासी' अंतर्वेशन करू नये, अशी आज्ञा केली. त्यामुळे त्यानंतर इस्लामी कालगणनेतील महिने सौर वर्षभर मागे-पुढे होऊ लागले. आता रमजान केवळ उन्हाळ्यात न येता इतर ऋतूंमध्येही येऊ लागला तरी त्याचे पूर्वीचे नाव टिकले.
 
रमजानचा उद्देश काय आहे?
मुसलमानांना या महिन्यातले सर्व 30 दिवस उपवास करण्याची आज्ञा आहे. त्याला रोजा असे म्हणतात. रोजा हा सूर्योदय ते सूर्यास्त काहीही न खाता आणि पाणीसुद्धा न पिता केला जाणारा उपवास आहे.
 
रोजा म्हणजे दिवस. व्रत पाळायचा दिवस. दररोज मधले ‘रोज’ आणि ‘रोजा’ या शब्दांचे फारशी मूळ सारखेच आहे.
 
रमजानच्या या महिन्यात करायच्या प्रत्येक धार्मिक कृतीमध्ये काहीएक भाव त्या त्या धर्मपालन करणाऱ्या माणसात निर्माण व्हावा, अशी योजना असते. नेहमीपेक्षा अधिक दानधर्म करणे (सदका), अंगी संयम निर्माण होण्यासाठी निर्जळी उपास करणे (रोजा), नेहमीपेक्षा अधिकच्या नमाज पढणे (तराविह), गरिबांना आर्थिक मदत करणे (जकात), घालून दिलेल्या नियमाप्रमाणे गरिबांना तुम्ही खाता त्यातलेच धान्य दान देणे (फितरा) अशा विविध गोष्टी मुसलमान या महिन्यात करतात.
 
या सर्व आचरणातून परोपकाराचा, अभावग्रस्तांच्या प्रति सहवेदनेचा आणि संयमाचा भाव मुसलमानांत निर्माण व्हावा अशा प्रकारे रमजान महिन्यातले सर्व नियम पैगंबर मोहम्मद यांनी सांगितले आहेत.
 
अष्टांग योगशास्त्रातल्या यम-नियमात जे नियम सांगितले आहेत, त्यातल्या बऱ्याच नियमांशी रमजानच्या नियमांत साधर्म्य आढळते.
 
अन्नसंस्कृतीच्या सन्मानाचा फरिश्ताचा संदेश
भारतात अरब-मुस्लीम सर्वप्रथम पश्चिम किनारपट्टीला आले आणि कायमचे वसले. ते इसवी सनाचं सातवं शतक होतं.
 
इ. स. 629 मध्ये केरळमध्ये निर्मिलेली चेरामन मशीद याचा इतिहास सांगत आजही उभी आहे. त्या सातव्या शतकापासून मुसलमान रमजान भारतात पाळत आहेत.
 
हा प्रदेश एकच एक ओळख सांगणारा नाही. इथे प्रत्येक बाबतीत वैविध्य आहे आणि तुमची निराळी ओळखही या विविधतेत विनासायास सामावली जाईल अशी आश्वासकता मुसलमानांना भारतात तेव्हापासूनच लाभली आहे. आणि तेसुद्धा इथल्या माती आणि संस्कृतीत तितक्याच आनंदाने मिसळून गेले आहेत.
 
विजापूर दरबारातला मध्ययुगीन दखनेचा प्रसिद्ध इतिहासकार मोहम्मद कासिम फरिश्ता यांने सोळाव्या शतकात 'दस्तूर-अल-तिब्ब' नावाचा फारसी ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाचे उद्देश इराण आणि मध्य आशियातून भारतात नव्यानं स्थलांतर करून येणाऱ्या विद्वानांना भारतातल्या उपचारपद्धतींची माहिती देणं आणि त्याबद्दल मार्गदर्शन करणं हे होते.
 
त्या ग्रंथात 'फरिश्ता' म्हणतो की, 'हा ग्रंथ इस्लामी ज्ञानाच्या वस्त्रांनी सुशोभित अशा सुहृदांसाठी आहे जे हिंदुस्तानातील ऋतू, हवामान आणि उपचारपद्धतीविषयी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत'.
 
याच ग्रंथात त्यानं दख्खनमध्ये त्याकाळी प्रचलित फणसापासून ते कमळापर्यंत निरनिराळ्या अन्नपदार्थांची गुणधर्मविषयक माहिती दिली आहे.
 
फरिश्ताचं या ग्रंथात इस्लामी विद्वानांना असं सांगणं दिसतं की, 'भारतात तुम्हाला इथल्या हवामानाशी ताळमेळ साधायचा असेल तर अनेक शतकं इथे चालत आलेल्या अन्नविषयक आणि उपचारपद्धतीविषयक ज्ञानाशी परिचय करून घ्यावाच लागेल; तुमच्या आधीच्या इस्लामी ज्ञानाच्या पूर्वग्रहातून इथल्या गोष्टींकडे पाहू नका, स्वीकारशील राहा.'
 
कुठल्याही लोकांबरोबर सहजीवनासाठी त्यांच्या अन्नसंस्कृतीचा सन्मान आणि तिचा अभ्यास आवश्यक आहे, हे शहाणपण फरिश्ताकडे दिसतं. भारतात आलेल्या सुफी साधूंनी इथल्या लोकांशी जोडलं जाण्यासाठी अनेक ठिकाणी अन्नछत्र (लंगर) उघडली होती, यातही हा समंजसपणा दिसतो.
 
फारसी-अरबीतून आलेले शब्द
अन्न हा कायमच लोकांना जोडणारा प्रभावी दुवा होता आणि आहे.
 
'अन्नं न निन्द्यात्‌। तद् व्रतम्‌।' म्हणजे ‘अन्नाची निंदा करू नये, ते व्रत आहे’ ही इथली उपनिषदांच्या काळापासून हजारो वर्ष चालत आलेली शिकवण आहे.
 
ही शिकवण होती म्हणूनच अरबी-फारसी खाद्यसंस्कृतीतले अनेक पदार्थ भारतीय खाद्यसंस्कृतीत विनासायास आले; त्यांची नावं इथल्या भाषांत रुळली. समोसा, गुलाबजाम असे सर्वांच्या आवडीचे पदार्थ त्यात आहेत.
 
पुदिना, पनीर, बर्फी, मसाला, सफरचंद, चपाती, हलवा असे कित्येक शब्द फारसी-अरबीतून येऊन आपल्या भाषांमध्ये रुळले आहेत.
 
सतराव्या शतकात रघुनाथ नवाथे यांनी रचलेल्या 'भोजनकुतूहल' या ग्रंथात, किंवा अठराव्या शतकातल्या जगन्नाथशास्त्री क्रमवंताच्या शब्दकोशात मलिदा, खरबूज, सामान असे अनेक फारसी शब्द दिसतात.
 
नवाथे आणि क्रमावंत तंजावर इथे राहणारे होते. तंजावरच्या सरफोजी राजांच्या दरबारात रचलेल्या 'शरभेंद्र पाकशास्त्र' या ग्रंथात महाराष्ट्रीय, तामीळ, फारसी, आणि युरोपीय पाकशैलींचा संगम दिसतो. स्वीकारशीलतेची ही उत्तम उदाहरणं आहेत.
 
खाद्यपदार्थांवरही सामाजिक-धार्मिक पगडा
आपली सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक ओळख तयार करणाऱ्या घटकांमध्ये अन्न प्रमुख आहे. या ओळखी आपण स्वतः तयार करतो किंवा त्या आपल्यावर लादल्या जातात. या ओळखी तयार करण्यात आपल्या स्वीकारशीलतेचा वाटा असतोच.
 
आपला आहार ही एकप्रकारे आपली ओळख असते. किंबहुना, आपण काय खात नाही, यावरही आपली ओळख ठरते. प्रत्येक व्यक्तीच्या खाण्याच्या स्वतंत्र आवडीनिवडी असतात हे वरपांगी दिसत असलं, तरी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी या बर्‍याच अंशी आपण ठरवलेल्या नसतात.
 
आपली जात, धर्म, लिंगभाव, आपण राहतो तो परिसर, आपली आर्थिक स्थिती, सामाजिक धारणा, अस्मिता यांतून आपण काय खावं किंवा काय खाऊ नये, हे ठरतं.
 
आपला आहार ही एकप्रकारे जशी आपली ओळख असते, तशीच ती आपण ज्या समूहात वावरतो, त्या समूहाचीही ओळख असते.
 
आपण काय खावं आणि काय खाऊ नये, याचा फारसा विचार बरेचदा समूह आपल्याला करू देत नाही. आपल्या समूहातले लोक जे खात आहेत, तेच आपणही खायला हवं, अशी सर्वसाधारण धारणा असते. खाण्यायोग्य पदार्थ कोणते, त्यांपैकी ‘शुद्ध’ कोणते व ‘अशुद्ध’ कोणते, एखादा पदार्थ शिजवण्याची योग्य पद्धत कोणती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्या त्या समूहाची संस्कृती ठरवते.
 
निषिद्ध खाद्यपदार्थ कोणते, नैवेद्यास काय चालतं आणि काय चालत नाही, लग्नात काय रांधावं व श्राद्धास काय वाढावं हे सामाजिक व धार्मिक नियमांनुसार ठरवलं जातं. त्यात थोडा बदल झाला की आपण (आणि आपला समूहही) अस्वस्थ होतो. 'आपण' आणि 'ते' अशी वर्गवारी ताबडतोब करून टाकतो. यातले 'ते' अर्थातच सतत बदलत राहतात.
 
खाद्यसंस्कृतीची उतरंड
जिलबी हा पदार्थ आपला नाही, असं आपण म्हणतो, तेव्हा आपण आपल्यात आणि त्या पदार्थात एक अंतर निर्माण करतो. तो पदार्थ आपल्याला लगेच परका होतो. 'आपले' आणि 'त्यांचे' पदार्थ अशी वर्गवारी करून आपण 'त्यांचं' खाणं जेव्हा नाकारतो, तेव्हा आपण त्या समूहाचं अस्तित्वच नाकारत असतो.
 
खाद्यसंस्कृतीची आपण तयार केलेली उतरंडसुद्धा आपल्या मनात सतत जागी असते. या उतरंडीत तथाकथित 'उच्च जाती' आणि धर्म यांच्या आहाराला आपसूक वरचं स्थान मिळालेलं असतं, कारण समाजाच्या चलनवलनाच्या नाड्या त्यांच्या हाती असतात. त्यातून या उतरंडीत 'खाली' असलेले काही पदार्थ कधीच खाऊ नयेत, असं आपल्याला सांगण्यात आलेलं असतं. पण इतर समूहांतले लोक ते खात असतात. अशावेळी त्या ‘इतरांच्या’ खाण्याबद्दल, आणि ‘इतरां’बद्दलही आपल्या मनात आकस निर्माण होतो.
 
आपण जे खातो, तेच इतरांनीही खावं, असा आग्रह आपण धरतो. एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला हवं ते खाऊ न देणं ही हिंसा आहे. वर्चस्व दाखवण्याचा तो एक सोपा मार्ग आहे. आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपण आपल्यापेक्षा वेगळी आहारपद्धती असलेल्या लोकांवर बंधनं आणण्याचा प्रयत्न करत असतो. ही वागणूक सुसंस्कृत आणि निरोगी समाजाचं लक्षण तर नाहीच, पण इतरांच्या घटनेनं दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करणारी आहे.
 
वैविध्यपूर्ण भारतीय खाद्यसंस्कृती
भारतीय खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आहे, असं आपण सतत सांगतवाचतलिहीत असतो. प्रत्येक राज्यात असंख्य भाषा, निरनिराळ्या समुदायांच्या अनेकविध वेशभूषा आहेतच, शिवाय प्रत्येक राज्याची, त्या राज्यातल्या विविध समुदायाची स्वतंत्र अशी खाद्यसंस्कृती व आहारशैली आहे.
 
प्रत्येक धर्माचे, जातीचे खाण्यापिण्याचे स्वतंत्र नियम आहेत व त्यानुसार पदार्थ रांधले जातात. शेकडो जातींची व उपजातींची आपापली पाकपद्धती आहे, आणि स्थानपरत्वे ती बदलतेही. पण आपण खातो ते अन्न सर्वत्र उपलब्ध व्हायला हवं, आपण खातो तेच सर्वांनी खायला हवं, असे आग्रह धरल्यानं खाद्यसंस्कृतीतलं वैविध्य नष्ट होतं, हे आपण लक्षात घेत नाही.
 
आपली खाद्यसंस्कृती मुळात देशोदेशींचे असंख्य प्रवाह बरोबर घेऊन पुष्ट झाली आहे. रागलोभ, मोह, गरिबी, अगतिकता, राष्ट्रवाद, युद्ध, स्वार्थ, द्वेष, स्थलांतर, जात, धर्म अशा असंख्य बाबींमुळे तिला आजचं रूप मिळालं आहे.
 
‘इतरां’च्या खाण्याबद्दल भीती, नावड बाळगून जसं आज आपण आपल्या सवयीच्या खाण्याला चिकटून राहिलो आहोत, तसंच भूतकाळात नव्याचा स्वीकारही केला आहे, हे लक्षात घेतलं तर खाद्यसंस्कृतीला एकारलेपण देण्याचा मोह सहज टाळता येतो.
 
काळाच्या ओघात आधीच्या काळातलं वैविध्य नष्ट झालं तरी नवं काही तर जन्म घेतंच, असा एक विचार आहे.
 
अनेक शतकांमधल्या सामाजिक आणि सांस्कृतिक हालचालींतून आणि घुसळणीतून नवं काही जन्माला येतं. अनेक पिढ्या या जन्मलेल्या नव्यामुळे निर्माण झालेल्या वैविध्यावर पोसल्या जातात. या वैविध्यामुळेच समाज आणि संस्कृती बहरतात आणि जुन्याशी न तुटणारी नाळ वागवत नवं काहीतरी पुन्हा जन्माला येतं. हे वैविध्यच समूहांना एकत्र बांधणारं सूत्र असतं. पण हे वैविध्य नाकारलं, जुन्याला जाणून न घेता त्याच्याकडे पाठ फिरवली, तर आधीच्या काळातल्या समाजाशी नातं सांगण्याची गरज अधिकच तीव्र होऊन बसते. मग आपण नव्यालाच जुनं समजायला लागतो. नव्यात नसलेलं वैविध्य जुन्यातही नव्हतं, असा समज करून घेतो. नसलेल्या परंपरा तयार करतो.
 
आजच्या संस्कृतीचा आरसा म्हणून ज्या गोष्टी सोयीस्कर वाटतात त्यांचीच सतत जोपासना होत राहते. किंवा मूळ वारसदारांकडून त्या हिसकावून घेऊन नव्यानं त्यांची जोपासना केली जाते. यामुळे तयार झालेल्या अस्मिता टोकदार असतात. समाजाच्या स्वास्थ्यासाठी त्या फारश्या चांगल्या नसतात.
 
परंपरेच्या नावाखाली सपाटीकरण
जागतिकीकरण झाल्यावर खाद्यसंस्कृती संकुचित होते आहे का, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो आहे. जागतिकीकरणामुळे राष्ट्रांच्या, प्रांतांच्या सीमा सच्छिद्र होतात. माणसं, वस्तू, आणि नवनवीन कल्पना इकडून तिकडे प्रवास करतात. सामाजिक व्यवस्था आणि व्यापारी माल, जागतिक बाजारपेठ आणि स्थानिक प्रशासनं, नागरिक आणि नवे सिद्धांत यांत दुवे तयार होतात. या प्रक्रियेमुळे पूर्वी भिन्न आहेत असे वाटणारे स्थानिक आणि जागतिक असे दोन वर्ग आता एकमेकांमध्ये अधिकाधिक गुंतलेले दिसू लागतात.
 
दुसर्‍या बाजूला वस्तूंना, खाद्यपदार्थांना प्रांतीयत्व, राष्ट्रीयत्व बहाल केलं जातं. आता त्यांच्यावर धार्मिक शिक्काही बसू लागला आहे. जागतिकीकरणामुळे जसं वैविध्य वाढतं, तसंच एकजिनसीकरण आणि सपाटीकरणही होतं.
 
स्थानिक पातळीवर किंवा देशभरात एकजिनसीकरण, सपाटीकरण घडून येण्यामागे धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक कारणंही असतात. परंपरेच्या नावाखाली आपण या एकजिनसीकरणाला उचलून धरतो.
 
‘सांस्कृतिक सपाटीकरणामुळे समाज कमकुवत होतो’
एक देश, एक वेश, एक भाषा, एक आहार ही एकाजिनसीकरणाची संकल्पना मूळ युरोपीय आहे. तिथून आपण ती उसनी घेतली. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशासाठी हे एकजिनसी असणं योग्य नाही.
 
सांस्कृतिक सपाटीकरणामुळे माणूस आणि समाज कमकुवत होतात, हे शासक नेहमीच जाणून असतात. आपल्या राजकीय फायद्यासाठी याचा ते वापर करून घेतात. ऑनलाईन समाजमाध्यमांची त्यासाठी मदत घेतली जाते.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वापरातून सहिष्णुता, लोकशाही ही मूल्यं समाजात झिरपावी, अशी अपेक्षा असते. इतर समाजाची संस्कृती जाणून घेणं अपेक्षित असतं.
 
पण आपण त्यांचा वापर करताना त्यांची मूल्यव्यवस्था नाकारतो. त्यांची मदत घेऊन द्वेष पसरवतो. इतरांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक धरणांना नाकारतो. तसं करताना परंपरेची ढाल पुढे करतो.
 
‘घडीव परंपरा’
आपली ‘परंपरा’ ही आपण शोधलेली, आपल्याला दिसते तशी असते. प्रत्येक कालखंडात परंपरेकडे निरनिराळ्या भिंगांमधून बघता येतं, बघितलं जातं. प्रत्येक कालखंडात बदल सातत्यानं घडत असतात. या बदलांचा वेग कमीजास्ती असतो, इतकंच. परंपरा प्रवाही असते आणि तिला सतत नवा आकार मिळत असतो.
 
जागतिकीकरण, स्थलांतर अशा अनेक कारणांमुळे बदल घडतात आणि हे बदल त्या संस्कृतीचे, परंपरेचे भाग होत जातात.
 
एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गणपतीला बहुसंख्य घरात लाडवांचा नैवेद्य दाखवला जाई. जोडीला मूषकासाठी खिरीचा नैवेद्य असे. आता सरसकट मोदक असतात.
 
आपण काही परंपरा जपतो, काही बदलतो. गणपतीला दाखवला जाणारा नैवेद्य बदलला तरी नैवेद्य दाखवण्याची परंपरा कायम राहिली.
 
आपण बर्गर किंवा पिझ्झा खाणं हा जागतिकीकरणाचा परिणाम असून, तो आता आपल्या परंपरेचा भाग झाला असला तरी नैवेद्य दाखवण्याची परंपराही कायम आहे. पूजेच्या दिवशी नैवेद्य दाखवण्यापूर्वी किंवा उपासाला आपण साबुदाण्याची खिचडी खातो.
 
साबुदाणा, शेंगदाणे, मिरची आपल्या आहारात आले ते जागतिकीकरणाचा एक भाग म्हणून. या नव्या ‘घडीव परंपरेला’ आपण आपल्या उपासाच्या परंपरेत सहज सामील करून घेतलं.
 
बटाटा, टोमॅटो, पाव-ब्रेडच्या गैरसमज आणि वादांचा इतिहास
संस्कृतीचं संवर्धन करण्याचा एक मार्ग म्हणजे पारंपरिक आहारशैलीचं जतन करणं, असा सर्वसाधारण समज आहे. आमच्या पूर्वजांनी जे खाल्लं नाही, ते आम्ही खाणार नाही, असं अनेक देशांतले लोक अनेक शतकं म्हणत आले आहेत. हेच कारण देऊन युरोपीयांनी आणलेली फळं, भाज्या आणि पेयं भारतीयांनी सुरुवातीस नाकारल्या.
 
बटाटा मूळचा द. अमेरिकेतला. पंधराव्या शतकानंतर हे कंदमूळ जगभर पसरायला सुरुवात झाली. सतराव्या शतकात पोर्तुगिजांनी भारतात बटाटा आणला, असा साधारण समज असला तरी त्याचा प्रसार केला तो ब्रिटिशांनी.
 
महाराष्ट्रात आणि बंगालात बटाट्याची एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस लागवड झाल्यावर हिंदूंनी त्यावर बहिष्कार टाकला. बटाटे महाराष्ट्रीय जेवणात येण्यासाठी नंतर पाचसहा दशकं जावी लागली.
 
टोमॅटोचा स्वीकारही सहजी झाला नाही. हे फळ विषारी आहे, ते खाल्ल्यास मनुष्य बाटतो, अशा समजुती होत्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतातले काही डॉक्टर टोमॅटोच्या रसातून घेण्यासाठी काही औषधं देत. अशा डॉक्टरांकडे हिंदू रुग्ण सहसा जात नसत.
 
आज मिसळीबरोबर पाव खावा की ब्रेड हा वाद उत्साहानं घालत असलेले आपण एकेकाळी पाव खाणाऱ्या लोकांना वाळीत टाकत असू.
 
पुण्यात चहा प्यायल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अनेकांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. हे पदार्थ आपण स्वीकारले आणि आपली खाद्यसंस्कृती विस्तारली.
 
म्हणूनच विविध आहारशैली, पदार्थ यांची ओळख समाजाला करून देणं अनेक थोर नेत्यांना महत्त्वाचं वाटतं.
 
‘सूपशास्त्र’ आणि ‘अल्वान्-ए-न्यामत’
फूलकोबी, सिमला मिर्ची, पपई, फरसबी अशी परदेशी पिकं शेतकऱ्यांनी घ्यावीत, म्हणून महात्मा फुले यांनी अथक प्रयत्न केले होते.
 
बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाडांच्या प्रेरणेनं प्रकाशित झालेली ‘सूपशास्त्र’ ही सहा ग्रंथांची मालिका स्वीकारशीलतेचं उत्तम उदाहरण आहे.
 
सयाजीरावांनी तामीळ, इंग्रजी, तंजावरी, फारसी, मुसलमानी, युनानी आणि मराठी पद्धतीच्या पाककृतींची पुस्तकं त्या त्या भाषांतून मराठीत अनुवाद करून घेतली. अत्यंत कमी किमतीत ही पुस्तकं उपलब्ध होती. या मालिकेतल्या चौथ्या अंकात ‘फारसी चालीचे पदार्थ’ दिले होते.
 
‘अल्वान्-ए-न्यामत’ या ग्रंथाचं हे मराठी भाषांतर विश्वासराव रघुनाथ सुभेदार यांनी 1894 साली केलं होतं. प्रस्तावनेत ‘या पुस्तकांत जे प्रकार दिले आहेत ते दिल्ली, लखनौ वगैरे प्रांतांत करण्याची वहिवाट आहे; अशा तर्‍हेचे पदार्थ आमच्या ह्या देशांत करण्याची फारशी माहिती नसल्यामुळें, या पुस्तकापासून लोकांस पुष्कळ उपयोग होईल अशी खात्री आहे’, असं म्हटलं होतं.
 
या पुस्तकात सुरुवातीला ‘भाकरींचे प्रकार’ आहेत. हे भाकरींचे प्रकार म्हणजे नानचे प्रकार!
 
नान हा शब्द मराठीभाषकांना अपरिचित आहे म्हणून, शिवाय या पदार्थाशी वाचकांचं नातं जुळावं म्हणूनही नान या पदार्थाला पुस्तकात भाकर म्हटलं आहे.
 
नानखताई भाकर, खमिरी भाकर, बेसनी भाकर, दस्तरखानी भाकर, कुलच्या भाकर अशा नावांनी नानचे विविध प्रकार पुस्तकात दिले आहेत.
 
एखादा सर्वस्वी अनोळखी पदार्थ त्या पदार्थाचं नाविन्य जपत वेगळ्या संस्कृतीतल्या वाचकासमोर कसा ठेवायचा याचा वस्तुपाठ बडोद्याच्या ‘सूपशास्त्र’ मालिकेत पाहायला मिळतो.
 
शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक रंजक चर्चा घडली. भारतीयांनी शिवणकला पर्शियन लोकांकडून उचलली, असा दावा केला गेला होता. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी तो सप्रमाण खोडून काढला. अशा चर्चा आवश्यक आहेत.
 
कारण कुतूहल, जिज्ञासा यांची पूर्ती होते. पण खाद्यसंस्कृतीचा आधार घेऊन 'आमच्याकडे पूर्वापार सगळं होतं, आम्हीच श्रेष्ठ' असे दावे करण्याला अर्थ नाही. ते खोटे तर आहेतच, शिवाय पोकळ राष्ट्रवादातून केले गेले असतात.
 
या टोकदार अस्मिता, अहंकार भारतीय सणांभोवती तयार झालेल्या खाद्यसंस्कृतीला हानी पोहोचवतात.
 
पदार्थाभोवती अस्मितांचं कोंदण घातक
खाद्यसंस्कृतीचे अनेकविध प्रवाह अभ्यासनं आपल्याला चांगला माणूस व्हायला मदत करतं. पण आपण खाद्यसंस्कृती आणि खाद्येतिहास यांच्या अभ्यासाची व्याप्ती फक्त एखादा पदार्थ कुठून आला एवढीच मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृतीचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पदर समजून घेतले जात नाहीत.
 
अमुक पदार्थाचा शोध कोणी लावला आणि तमूक पदार्थ कुठून आला एवढंच आपण बघतो. त्यामुळे त्या पदार्थाभोवती अस्मितांचं कोंदण तयार होतं.
 
एखाद्या पदार्थाच्या इतिहासाबद्दल अस्मितेला केंद्रस्थानी ठेवून चर्चा सुरू झाली की वस्तुनिष्ठतेला जागा उरत नाही.
 
इफ्तारला मित्र-मैत्रिणी येत, मी गणेशोत्सवाला जात असे – हारून शेख
आपले सण सौहार्द, प्रेम, आनंद यांचे प्रतीक आहेत. ते साजरे करताना आपण आपल्या कुटुंबाशी, समाजाशी अधिक घट्ट जोडले जातो. मी (हारून शेख) लहान असताना माझे शेजारी, मित्र-मैत्रिणी आमच्यासोबत रोजा पाळत असत आणि इफ्तारसुद्धा आमच्यासोबत करत असत.
 
मीसुद्धा त्यांच्यासोबत गणेशोत्सवात सामील होत असे. आषाढी-शिवरात्रीच्या दिवशी आमच्याकडेही उपवासाची खिचडी केली जाई.
 
शेजारघरी ती दिली जाई, त्यांना उपवासाच्या खिचडीत कोथिंबीर चालत नसे. त्यामुळे आई लक्ष्यात ठेवून ती तशी खिचडीत टाकत नसे. दिवाळीत त्यांच्याकडून फराळ येई. प्रत्येकच बाबतीत सलोखा खूप होता.
 
मला लहान असताना प्रत्यक्ष पाहिलेला एक प्रसंग आठवतो. ईदचा बाजार होता. मी आईसोबत बाजारात गेलो होतो. मेवा आणि शेवयांची हारीनं दुकानं लागलेली होती.
 
एक गरीब बाई ईदच्या शिरखुर्म्याचं सामान खरेदी करत होती. सगळी खरेदी केल्यावर तिच्या लक्ष्यात आलं की, गर्दीत तिचं पाकीट कुठेतरी पडलं आणि हरवलं आहे. तिचे सर्व पैसे त्या पाकिटातच होते म्हणत ती रडू लागली.
 
आजूबाजूची गर्दी हळहळली. पण अजून माणुसकीचं दर्शन आम्हाला घडायचं होतं. तिथे नजीकच बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसानं त्या बाईच्या सर्व खरेदीचे पैसे दुकानदाराला परस्पर देऊन टाकले. त्या बाईलाही काही पैसे देऊ केले. तिने ते घेतले नाहीत.
 
पण तिच्या डोळ्यातली कृतज्ञता आणि त्या पोलिसाच्या चेहऱ्यावरचे समाधान मला कधीच विसरता येणार नाही. भिन्नधर्मीय असूनही एका सणापूर्वी पैसे हरवून बसलेल्या बाईची अगतिकता त्या पोलीसमामाने जाणली होती. अशा भारतात आपण लहानाचे मोठे झालो.
 
एकमेकांच्या चालीरीती, परंपरा याबद्दल आस्थेनं माहिती करून घेऊन सहजीवन जगणारी लोक आपल्या लहानपणी होती.
 
'आमच्या शाळेत फक्त आपल्या सणांना सुट्टी असते ' असं अभिमानानं सांगणाऱ्या शाळा फार कमी होत्या. वर्गात सर्व जातींची, धर्मांची मुलं असतं. परस्परांबद्दल ज्ञान आणि समज असल्यामुळे त्यावेळी लोकांना 'सांस्कृतिक धक्के' बसत नसत.
 
आता विद्वेषपूर्ण राजकारणामुळे ही शहाणीव संपत चालली आहे. त्यामुळे बसणाऱ्या सांस्कृतिक धक्क्यांचं प्रमाण आणि त्यामुळे केला जाणारा गहजबही पुष्कळच दिसू लागला आहे.
 
धर्म-जाती-वंश यातून उत्पन्न झालेल्या द्वेषाच्या भिंती अधिकाधिक अभेद्य आणि उंच होऊ पाहताहेत. साम्य शोधण्याऐवजी फरकच ठसठशीत अधोरेखित करण्यात ऊर्जा खर्च होते आहे.
 
बहुसांस्कृतिकता जपली जावी...
1933 साली जिलबी 'आपली' नाही, म्हणून आपण ती नाकारली असती तर? अनेक लग्नांमधला गोडवा हरवला असता.
 
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण जिलबीशिवाय कसे साजरे झाले असते?
 
भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. बहुसांस्कृतिक असणं म्हणजे काय? पूर्वग्रह बाजूला ठेवून आपल्या जातीय-धार्मिक समूहाच्या चालीरीतींशिवायही समाजात, देशात, जगात इतर समूहांच्या काही परंपरा, चालीरीती आहेत, हा देश त्यांचाही आहे, याची जाण ठेवणं, ही बहुसांस्कृतिकता.
 
आपल्याला न आवडणार्‍या, न रुचणार्‍या, सवयीच्या नसणाऱ्या गोष्टी इतरांना करू देणं, हे स्वातंत्र्याचं लक्षण आहे. हे स्वातंत्र्य खाण्यापिण्याच्या बाबतीतही सर्वांना लाभो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

श्री सूर्याची आरती

आरती शनिवारची

कूर्मस्तोत्रम्

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments