Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रमजानचा उपवास केल्यामुळे शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2024 (11:18 IST)
आजपासून (12 मार्च ) रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजान सणानिमित्त दरवर्षी जगभरातले कोट्यवधी मुस्लीम नागरिक 30 दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात.गेल्या काही वर्षांत उत्तर गोलार्धात रमजानचा महिना हा उन्हाळ्यात येत आहे. त्यामुळे नॉर्वेसारख्या काही देशांमध्ये लोक जवळपास 20 तास उपवास करताना दिसतील.
 
पण, हे आरोग्यासाठी चांगलं आहे का? मग, जाणून घ्या 30 दिवस उपास केल्यावर शरीराचं नेमकं काय होतं?
सगळ्यांत कठीण भाग- पहिले दोन दिवस
तांत्रिकदृष्ट्या तुमचं शरीर शेवटचं अन्न घेतल्यानंतरचे आठ तास तरी 'उपवासाच्या अवस्थेत' पोहोचत नाही.
 
ही तीच वेळ आहे, ज्या काळात तुमचं आतडं अन्नातले पोषक घटक शोषून घेत असतं.
ही वेळ संपल्यानंतर तुमचं शरीर यकृत आणि स्नायू यांच्यात साठवलेलं ग्लुकोज म्हणजेच साखर शोषून घेण्यास सुरुवात करतं. यानंतर काही वेळानं उपवासाच्या काळात यकृत आणि स्नायूंमधलं हे ग्लुकोज संपलं की शरीरातले फॅट्स म्हणजेच चरबी हा शरीराला उर्जा पोहोचवणारा स्रोत ठरतो.
जेव्हा या चरबीच्या ज्वलनाची म्हणजेच शरीरात उर्जा म्हणून चरबीच्या वापराची सुरुवात झाल्यावर वजन कमी होण्यास सुरुवात होते. तसंच, यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि डायबिटीसचा धोकाही कमी होतो.
 
पण, रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झाल्यानं थकवा जाणवण्यास सुरुवात होते. यामुळे डोकेदुखी, गरगरल्यासारखं वाटणं, मळमळणं आणि तोंडाला वास येणं यासारखी लक्षणं दिसू लागतात.
पाण्याच्या कमतरतेची काळजी घ्या
जेव्हा शरीर उपवासाच्या अवस्थेला सरावतं, तेव्हा शरीरातल्या चरबीचं ज्वलन होऊन रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढू लागतं.
 
उपवासाच्या काळात शरीरात पाणी कमी प्रमाणात जातं. यासाठी पाणी लवकर पिणं आवश्यक आहे. नाहीतर घामामुळे शरीरातलं पाणी निघून गेल्यानं शरीरातली पाण्याची पातळी खालावते.
तसंच, उपवासानंतर घेतलेल्या जेवणात उर्जा मिळवण्यासाठीचे घटक आवश्यक आहेत. म्हणजेच, कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचा त्यात समावेश असावा.
 
त्याचबरोबर प्रोटीन्स, फायबर यांसारख्या पोषक घटकांचा आणि विशेषतः पाण्याचाही समावेश यात असावा.
 
उपवासासाठी सरावताना
या तिसऱ्या टप्प्यात आपलं शरीर उपवासासाठी बऱ्यापैकी सरावलं असल्यानं आपला मूडही चांगला राहत असल्याचं जाणवतं.
 
केंब्रिजमधल्या अॅडेनब्रूक हॉस्पिटलच्या अॅनेस्थेशिया आणि इंटेनसिव्ह केअर मेडीसिन विभागाचे कन्सलटंट डॉ. रझीन महारुफ यांनी यातले काही फायदेही सांगितले.
महारुफ सांगतात, "रोजच्या आयुष्यात आपण मोठ्या प्रमाणात कॅलरींचं सेवन करत असतो. यामुळे शरीराला पूर्ण क्षमतेनं काम करता येत नाही. तसंच, शरीरांतर्गत दुरुस्ती म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीही मंदावते. या सगळ्याची उपवासादरम्यान भरपाई केली जाते. त्यामुळे शरीराला आपल्या अन्य प्रक्रियांकडे वेळ देण्यास लक्ष मिळतं. त्यामुळे उपवासाचा शरीराला एक प्रकारे फायदाच होतो."
 
विषजन्य घटक निघण्याची प्रक्रिया
 
रमझानच्या शेवटच्या महिन्यात तुमचं शरीर उपवासाला पूर्णतः सरावेललं असतं. तुमचं आतडं, लिव्हर, किडनी या अवयवांमधून शरीराला नको असलेले विषजन्य पदार्थ शरीरातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.
याबाबत डॉ. महारुफ सांगतात, "या टप्प्यांत अवयवांचं काम चांगलं आणि वेगानं सुरू असतं. आपली बुद्धी तल्लख झालेली असते तर आपल्यात उर्जा वाढल्याचा भास येत असतो. यावेळी शरीर उर्जेसाठी प्रोटीनकडे वळत नाही. संपूर्णतः उपवासाच्या अवस्थेत असल्यानं या काळात शरीर उर्जेसाठी स्नायूंचा वापर करतं. बराच काळ उपवास घडल्यानं ही अवस्था येते."
 
डॉ. महारुफ पुढे सांगतात, "रमझानचा उपवास हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालत असल्यानं उर्जा मिळवण्यासाठी आणि अन्न घेण्यासाठी वेळ मिळतो. यानं स्नायूंना शक्ती मिळते आणि वजन कमी होण्यासही मदत होते."
 
मग, हा उपवास आरोग्यासाठी चांगला आहे का?
हो. मात्र, काही अटींवरच हे शक्य असल्याचं डॉ. महारुफ सांगतात.
 
डॉ. महारुफ याबाबत बोलताना सांगतात, "आपल्या आहारावर नियंत्रण येत असल्यानं उपवास करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. मात्र, एक महिना हा उपवासासाठी चांगला काळ असून यापेक्षा जास्त काळ उपवास करणं चांगलं नाही."
डॉ. महारुफ पुढे सांगतात, "वजन कमी करण्यासाठी सतत उपवास करतच राहणं हे चांगलं नाही. कारण, शरीर फॅट्सचं उर्जेत रुपांतर करण्याची प्रक्रीया कायमचं थांबवतं. हे आरोग्यदायी नाही आणि तुमचं शरीर कायम उपवासाच्या अवस्थेत पोहोचलं आहे असा याचा अर्थ होतो."
 
रमजान व्यतिरिक्त आठवड्यातून 5:2 म्हणजेच केवळ पाच दिवस अन्न घेणं आणि दोन दिवस उपवास करणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल.
 
महारुफ सांगतात की, "रमजानचा उपवास योग्य रितीनं केल्यास आणि आहार घेतल्यास चांगली उर्जा मिळते. यामुळे वजन कमी होतं, पण स्नायूंचं नुकसानही यात कमी होतं.
 
Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

Budhwar puja vidhi : बुधवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

विष्णुस्तवराजः

Tulsi vivah 2024 Upay: तुळशी विवाहाच्या दिवशी यापैकी एक तरी उपाय करा, समृद्धी मिळवा

गौरगणोद्देशदीपिका

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments