नाशिक महापालिकेच्या ताफ्यात आता १०० नव्या सीएनजी सिटीलिंक बस येणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारा पाथर्डी फाटा येथील सीएनजी गॅस प्रकल्पही सुरू झाला आहे. या निर्णयामुळे शहरातील सिटी बसची संख्या वाढणार असून सोबत इतक्या दिवस तोट्यात असणाऱ्या व्यवस्थापनाला आर्थिक बळही मिळणार आहे.
नाशिकमध्ये सिटीलिंक बससेवेची सुरुवात झाल्यानंतर पाच टप्प्यात २५० बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या १०० आणि डिझेलवर चालणाऱ्या ५० बस आहेत. उर्वरित १०० बसला सीएनजी मिळत नसल्याने त्या बंद होत्या. मात्र, पाथर्डी येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने ०२ मार्च रोजी प्रकल्पाचा नारळ फोडला. त्यामुळे महापालिकेचा बस सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला.
दरम्यान पाथर्डी येथील गॅस प्रकल्प सुरु झाला असून रविवारी महापालिकेला १२०० किलो इतके सीएनजी मिळणार आहे. त्यानुसार येत्या सोमवारी १५ बस सुरू होणार आहेत. एप्रिलपर्यंत १२००० किलो सीएनजी मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरात १०० सीएनजी बस रस्त्यावर धावणार आहेत. नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दिवसाकाठाचे उत्पन्न वाढूनही सेवा तोट्यात जात होती. आता सीएनजीवर सिटी बस धावल्या तर इंधन खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे बस व्यवस्थापनाचा तोटाही कमी होणार आहे.