महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा कायम असताना माजी महसूल राज्यमंत्री व सध्या भाजपचे विधान परिषदेचे सदस्य असलेले सुरेश धस यांनी मंत्री असताना तब्बल १ हजार कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केला, अशी तक्रारच ईडी कार्यालयात देण्यात आली आहे.
बीड जिह्यातील आष्टी तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इनाम जमिनींचे तब्बल १००० कोटी रुपयांचे गैरव्यवहार मनी लाँड्ररिंग प्रक्रिया वापरून लाटल्याचा आरोप करणारी तक्रार आज ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख अब्दुल गनी यांनी ॲड.असीम सरोदे, ॲड.अजित देशपांडे, ॲड.अक्षय देसाई व ॲड. मदन कुर्हे यांच्या मदतीने दाखल केली आहे.
इनामी जमिनी ज्यामध्ये वक्फच्या व देवस्थानच्या जमिनींचा समावेश आहे. अशा अनेक जमिनींचा बेकायदेशीरपणे खरेदी-विक्रीचा व्यवहार माजी मंत्री व आताचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या योजनेनुसार त्यांच्यासाठी कार्यरत अनेक माणसांनी केला आहे, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
हे सगळे व्यवहार करतांना बेहिशेबी रक्कमा फिरवणे, स्वतःच काढलेल्या मच्छिंद्र मल्टीस्टेट कॉ. क्रेडिट बँकेतून मोठ्या रक्कमांचे लोन देणे असे प्रकार घडले आहे. धक्कादायक म्हणजे, ज्यांची आर्थिक पात्रता नाही पण जे आमदार सुरेश धस यांचे खास आहेत अशा आपल्या कार्यकर्त्यांना जमिनी देणे व त्या माध्यमातून जमिनी बळकावणे असे अनेक व्यवहार हे मनी लाँडरिंग सारखा प्रकार असल्याचे स्पष्ट करणारे आहेत, असे राम खाडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सुरेश धस महसूल राज्यमंत्री असल्यापासून या बेकायदेशीर व्यवहारांसाठी पैसा कसा फिरविण्यात आला व त्याला कशी चालना देण्यात आली, कसे खतपाणी घालण्यात आले ती सगळी प्रक्रिया आष्टी तालुक्यात व बीड जिल्ह्यात झालेल्या काही जमीन व्यवहारांच्या कागदपत्रांवरून स्पष्ट दिसते असे तक्रारदार गनी भाई म्हणाले. एका जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी धाड टाकली होती.
देवस्थानच्या व मशिदीच्या इनाम जमिनी ह्यामध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून, पाठबळाने व महसूल खात्याच्या आशिर्वादाने जवळपास १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक जमिनींच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडविण्यात आला व सामान्य माणसाची फसवणूक झाली आहे असं तक्रारारदारांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या जमिनी हैद्राबाद इनाम निर्मुलन कायद्यानुसार “खिदमतमाश जमीनी” आहेत, त्या विकण्यास कायद्याने परवानगी नाही कारण त्याचे मालक देव किंवा अल्ला आहेत. ज्याला कायद्याच्या भाषेत “लीगल फिक्शन” म्हणतात व त्या इनाम जमिनीचे मूळ भोगवटदार हे फक्त त्या जमिनीचे “विश्वस्त” म्हणजेच ट्रस्टी असतात. विश्वस्तांना जमिनींचे मालक बनवण्याचे काम करण्यासाठी सुरेश धस यांनी संपूर्ण यंत्रणा हाताशी घेतली त्यामुळे हा अनेक लोकांनी मिळून केलेल्या संघटित आर्थिक गुन्हेगारीचा प्रकार आहे, असं तक्रारारदारांचे वकील असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.