गिनीज बुकात महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल म्हणून नावलौकिक मिळवलेला तथा मालकाला कर्ज मुक्त करणार्याक बैलाने सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील अखेरचा श्वास घेतला आहे.
जन्म बैलाचा पण देह हत्तीचा
कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास एक टन वजन असलेल्या गज्याला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते. गजाच्या मृत्यूनंतर परिवाराला दु:ख अनावर झाले. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण राहिलेल्या गज्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे जन्म बैलाचा पण देह मात्र हत्तीचा असलेल्या गज्याला कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची.
मालकाला कर्जमुक्त करणारा बैल गेला
तसेच गजा बैलाने या माध्यमातून मालक सायमोते यांना कर्जमुक्त केले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्याला न विकता त्याचा शेवटपर्यत सांभाळ केला. काल बुधवारी दुपारी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
गजाच्या हाडांचा सापळा संग्राहलयात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार
कृष्णा सायमोते यांनी त्यांच्या घरच्या शेतात गज्यावर अंत्यसंस्कार केले. गज्याच्या अकाली जाण्याने कसबे डिग्रजसह तमाम बैलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. प्रचंड देह आसलेल्या गजाच्या हाडांचा सापळा संग्राहलयात ठेवण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.