Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बीडमध्ये 8 वर्षीय दलित मुलाला चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून झाडाला बांधले, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

crime news
, सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (10:17 IST)
बीडमध्ये चॉकलेट चोरल्याचा संशयावरून तब्बल दीड तास लहान मुलाचे हातपाय बांधून त्याला उन्हात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
बीडमधल्या केज तालुक्यात येवता नावाच्या गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
येवता गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका आठवर्षीय चिमुरड्यासोबत 29 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला आहे.
 
जिल्हा परिषद शाळेजवळ किराणा दुकान चालवणाऱ्या कविता जोगदंड यांनी "चॉकलेट का चोरतोस?" असं विचारत बळजबरीने या मुलाचे हातपाय बांधून ठेवल्याचा आरोप आहे.
 
सध्या आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
याप्रकरणी मुलाचे वडील संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
येवता गावात घडलेल्या प्रकरणाबद्दल बोलताना माजलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बी. धीरज कुमार यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
 
"येवता गावात एका महिलेने लहान मुलाला बांधून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तिन्ही आरोपी सध्या फरार असून आम्ही एक ते दोन दिवसांमध्ये आरोपींना अटक करून पुढील चौकशी करणार आहोत. बीड जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत," असं ते म्हणाले.
 
मुलाचे हातपाय झाडाला बांधले
अल्पवयीन मुलाचे वडील संतोष गायकवाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "मी मजुरी करून कुटुंब चालवतो. मला तीन लहान मुलं आहेत. हा प्रकार घडला त्यादिवशी (29 ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मी पत्नीसोबत शेलगाव गांजी नावाच्या गावात कामासाठी गेलो होतो.
 
माझा मुलगा नेहमीप्रमाणे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत गेला होता. मी आणि माझी पत्नी दुपारी एक वाजता परत आलो. पण माझा मुलगा जेवायला घरी आला नव्हता. तो रोज बारा वाजता घरी येऊन जेवून जातो."
 
संतोष गायकवाड म्हणाले की, "माझा मुलगा घरी आला नाही म्हणून मी आजूबाजूच्या मुलांकडे चौकशी केली. तर त्यांना काही माहिती नव्हतं. मग दुपारी दीडच्या सुमारास मी शाळेकडे गेलो. तर रस्त्यात पांडुरंग जोगदंड यांच्या घरासमोर माझ्या मुलाला बांधून ठेवल्याचं मी बघितलं. त्यांच्या घरासमोरील झाडाला माझ्या मुलाचे हात पाय बांधले होते. तिथे कविता जोगदंड उभ्या होत्या."
 
संतोष म्हणाले की, "मला बघून त्या (कविता) म्हणाल्या की, तुझा मुलगा चोरटा आहे. त्याने माझ्या दुकानातील चॉकलेट चोरलंय आणि म्हणून मी त्याला झाडाला बांधून ठेवलं आहे. मला काही सुचत नव्हतं, मी माझ्या मुलाचे हातपाय सोडवले आणि कविता यांचे पती पांडुरंग जोगदंड यांना म्हणालो की, हे बरोबर नाही. यावर पांडुरंग जोगदंड म्हणाले की, 'तुला काय करायचं ते कर (जातीवाचक शब्दही वापरला) , चूक काय बरोबर काय, हे तू आता आम्हाला शिकवणार का? तिथेच त्यांचा मुलगाही उभा होता. तो देखील तसंच बोलू लागला."
 
पाणीही दिले नाही, फटके मारले
संतोष गायकवाड यांनी त्यांच्या मुलाकडे चौकशी केली असता, त्याने सांगितलं की, "झाडाला बांधून ठेवल्यावर माझा मुलगा रडायला लागला. आता रडलास तर अजून मारेन म्हणून कविता यांनी मुलाला पाठीत चापटीने मारले. माझ्या मुलाने पाणी मागितलं तर त्याला पाणीही दिलं नाही."
 
संतोष गायकवाड म्हणाले की, "चॉकलेट घेतल्याच्या संशयावरून माझ्या मुलाला त्यांच्या घरासमोर, सार्वजनिक ठिकाणी, अंगणात, सर्व लोकांना दिसेल अशा पद्धतीने झाडाला बांधून ठेवलं. मला जातीवाचक शिवीगाळ केली गेली. मला न्याय हवा आहे."
 
याप्रकरणी केज पोलिसांनी कविता जोगदंड, पांडुरंग जोगदंड आणि गोपाळ जोगदंड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 351(2), 351(3), 3(5) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989च्या कलम 3(1)(r), 3(1)(s) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
 
या घटनेमुळे भेदरलेल्या या मुलावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
 
सरकारी आकडेवारीनुसार मागच्या आठ वर्षांपासून राज्यात घडणाऱ्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

Published By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींनी मागितलेली माफी स्वीकारण्यास विरोधकांचा नकार, उद्धव ठाकरे म्हणाले- मग्रुरीने मागितली माफी