Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

फरार असलेल्या अजित पवार गटाच्‍या जिल्हाध्यक्षाला अटक, काय आहे प्रकरण?

arrest
, रविवार, 7 एप्रिल 2024 (10:18 IST)
मीरा रोड :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना पोलिसांनी अटक केली. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळातील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोहन पाटील गेल्या महिन्याभरापासून फरार होते. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी त्यांना अटक केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील हे शुक्रवारी पोलिसांना शरण आले. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता, त्यांना ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पाटील हे संस्थेचे कार्याध्यक्ष असताना त्यांनी विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, डिजिटल ओळखपत्र देणे व संगणकांची देखभाल दुरुस्ती यासाठी रिंग इंडिया या ठेकेदार कंपनीला वार्षिक १ कोटी ३८ लाख, असा ५ वर्षांकरिता ६ कोटी ९० लाखांचा ठेका दिला होता. तसेच शालेय पोषण आहाराचे काम स्वतःच्या मधुमोहन महिला बचत गटाला परस्पर दिले.
 
शासनाच्या योजनेतील तांदूळ विकला. बचत गटाच्या अध्यक्षानेच याबाबत आपल्याला माहिती नाही व पाटील यांनी कोऱ्या धनादेशावर स्वाक्षऱ्या घेतल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु बचत गटाने सुमारे ८५ लाख रुपये संस्थेच्या खात्यात जमा केले होते. २०१९ मध्ये नवघर पोलिस ठाण्यात मोहन पाटील, संस्थेचे लेखापाल प्रशांत नरेश पाटील, रिंग इंडियाचे भागीदार न्यूमान रेहमान आणि कुणाल गुडेकर, संस्थेचे वासुदेव पाटील, गुरुनाथ पाटील, दिलीप पाटील, शरद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
 
या गुन्ह्याचा तपास मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता. उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मोहन पाटील व प्रशांत पाटील यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले, तर अन्य आरोपींना जामीन मंजूर केला होता. प्रशांत पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र, ११ मार्चला तो फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे प्रशांत पाटील याने १५ मार्चला आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बबन घोलप यांनी शिंदे गटा सोबत जाण्याचा निर्णय घेतला