पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुकवर बदनामीकारक चित्र प्रसिद्ध केले होते, त्याविषयी वैचारिक जाब विचारल्याच्या रागातून चाकणकर यांनी पदाचा गैरवापर करून मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे. चाकणकरांकडून अनेक तरुणांवर याच पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.
चाकणकर यांच्या कृतीचा संभाजी ब्रिगेड संविधानाच्या चौकटीत राहून समाचार घेणार आहे, असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी गुरुवारी दिला.
कणसे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभाग अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, प्रशांत नरवडे, शांताराम कुंजीर, वैभव शिंदे, कैलास कणसे आदी उपस्थित होते. कणसे म्हणाले, ह्लह्वचाकणकर यांच्या फेसबुकवर वापरलेल्या ह्लइडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे या चित्रातून बळीराजाचा अवमान झाला होता.
त्याविषयी मी यांचे सोशल मीडिया कोण हाताळते ? हे चित्र काय दर्शविते अशा शब्दात वैचारिक पोस्ट लिहून त्यांना जाब विचारला होता. त्यानंतर त्यांनी माझ्या विरुद्ध सायबर पोलिसात दिली. इतकेच नव्हे, त्यांच्यावर यापूर्वी अश्लील पोस्ट लिहिणा-या पाच जणांविरुद्ध दाखल गुन्ह्याशी माझे नाव जोडून माध्यमांमध्ये बातम्या पसरविल्या.
त्यावरुन चाकणकर त्यांच्याकडील पदाचा गैरवापर करून जाब विचारणा-या चळवळीतील तरुणांविरुद्ध पोलिसांद्वारे कारवाई करीत आहेत. हा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितला जाईल, तसेच चाकणकर यांच्या सुडवृत्तीविरुद्ध राज्यभर विरोधाची भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.