पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीची बैठक संपताच छापा मारला. यात महापालिकेतील स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतला आहे. तर, एसीबी कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महापालिकेत एकच खबळबळ उडाली आहे.
याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया (लिपिक), राजेंद्र जयंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भीमराव काळे (शिपाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होर्डींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या २८ निविदा मंजुर झालेल्या होत्या. परंतु त्यांची वर्कऑर्डर न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले. तेव्हा, वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी च्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाऊंट) ३ टक्के रक्कम म्हणजे १० लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ टक्केप्रमाणे सहा लाख रूपये घेण्याचे मान्य झाले. ६ लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी आज तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक – विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई, अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारल्यावर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.