गाडीवर बसताना नेहमी सावधगिरी बाळगावी असे सांगितले जाते. गाडीवर नेहमी व्यवस्थित कपडे परिधान करावे. ओढणी नीट बांधावी जेणे करून गाडी चालवताना काही अपघात होऊ नये. ओढणीमुळे गळफास लागून एका महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना मुंबई -अहमदाबाद महामार्गावर घडली आहे.
सदर घटना मुंबई -अहमदाबाद महामार्गावर बुलेटवरून हे पती पत्नी येत वसई बाफाणे हद्दीत आले असताना घडली. या अपघात पत्नीचा ओढणीने गळफास लागून मृत्यू झाला. प्रतिमा यादव असे या मयत महिलेचे नाव आहे.
कांदिवली पश्चिम ईराणीवाडी नंबर 04, ठाकूर चाळ, लक्ष्मी निवास मध्ये राहणारे यादव मनीष यादव आणि प्रतिमा यादव हे पती पत्नी रविवारची सुट्टी असल्यामुळे कांदिवलीतून वसईच्या तुंगारेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी बुलेटवरून निघाले. दर्शन घेऊन मुंबई- अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत आले असता प्रतिमांच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. गाडीच्या चाकात ओढणी अडकल्यामुळे तिला गळफास लागला आणि ती बुलेट वरून खाली पडली. खाली पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे ठाकूरचाळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.