सातारा ( – महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करीत असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
पारंपरिक शेतीला अत्याधुनिक शेतीची जोड देत शेतकरी शेती करण्याबरोबर सेंद्रीय शेतीकडेही वळत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एन.डी.आर.एफ. च्या निकषात बदल करुन राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 750 कोटीच्या मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजाराची मदतही देण्यात आली. जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांची जनावरे दगावले आहेत त्यांनाही शासनामार्फत मदत करण्यात येत आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण तसेच प्रगतशील शेतकऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होणार आहे. शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक उन्नती साधावी. हीच खरी स्व. यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली ठरेल, असेही मुख्यमत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याचे मार्गदर्शन केले जाते. हे प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. कृष्णा कोयना या नद्या शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम करीत आहे. कराड, पाटण, सातारा येथील शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा मानस आहे. या संकुलाच्या माध्यमातून विविध पिकांचे संशोधन करण्यात येईल.
जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांमध्ये मान्सुन कालावधीत मोठा पाऊस पडतो. पण जानेवारीनंतर येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यांना बारमाही पाणी मिळावे म्हणून जलयुक्त शिवारासारखी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष निधी मिळावा अशी मागणीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केली.
कराड विमानतळाचे एमआयडीसीकडे हस्तांतरण करावे – उद्योग मंत्री उदय सामंत
उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, कराडचे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरण केल्यास या विमानतळाचा चांगला विकास केला जाईल तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी पाचशे एकरवर ॲग्रो इंडस्ट्रीज् विकसित करता येईल यासाठी मान्यता मिळावी.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रगतशील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे, सोनगांव ता. जावली, सौरभ विनयकुमार कोकिळ, धामनेर ता. कोरेगांव, सौ. रुपाली सत्यवान जाधव, कर्नवडी ता. खंडाळा, श्री. विजयसिंह पोपटराव भोसले जिजामाता शेतकरी स्वयं सहायता समूह, पेरले ता. कराड व श्री. श्रीकांत महादेव घोरपडे, निसराळे ता. सातारा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.