मालेगावः अंत्यसंस्कारानंतर अस्थी व रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. या पारंपरिक प्रथेला फाटा देत येथील उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांनी आपल्या काकांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी व रक्षा आपल्या वडिलोपार्जित शेतात खड्डा खोदून विसर्जित केल्या आणि त्या जागेवर वृक्षारोपण केले.
आपल्या प्रियजणांचे अस्थी व रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय भावूक व संवेदनशील असतो. प्रिय जणांच्या अस्थी विसर्जीत करताना शक्यतो पवित्र गंगा, गोदावरी नदीच्या पात्रात व अथवा गावाजवळील नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जित करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजणांच्या स्मृती कायमस्वरूपी आपल्या ह्रदयात जतन राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र याला अपवाद ठरले आहे, ते मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अहिरे कुटुंबिय. नुकतेच येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी कै. सुरेश महिपतराव अहिरे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना अपत्य नव्हते, मात्र त्यांनी आयुष्यभर आपल्या धाकट्या भावाच्या तीनही मुलांवर जिवापाड प्रेम केले. त्यांना फुलांच्या व फळांच्या झाडांची मोठी आवड होती. त्यांनी आपल्या घराजवळ विविध प्रजातीच्या झाडांची लागवड केली होती. ते तासनतास या बागेत रमत असत. त्यामुळे वृक्षलागवडीतून भविष्यात पुढील पिढीला मायेची सावली व मधूर फळे चाखायला मिळतील व त्यातून आपल्या काकांच्या स्मृती कायम स्मरणात राहातील असा विचार त्यांचा पुतण्या प्रा. अमोल अहिरे यांनी मांडला असता, त्यास अहिरे परिवाराने होकार दिला.
अंत्यसंस्काराचा एक भाग म्हणून दशक्रिया विधीसाठी केवळ मूठभर रक्षा व अस्थी अहिरे परिवाराने काढून ठेवल्यात व तेवढ्याच नदीत विसर्जित केल्या. उर्वरित सर्व रक्षा व अस्थी आपल्या दाभाडी येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी खड्डा खोदून टाकल्या. त्यावर सिशम, वड, पिंपळ, रामफळ, जांभूळ आदी प्रजातीच्या वृक्षाचे रोपण केले. यावेळी अहिरे परिवारातील बाळासाहेब अहिरे, मुले, अमोल, अश्विन, अभिजीत सुना, अमृता, कावेरी, पूजा, नातवंडे, आराध्य, राम, वैष्णवी, डिंपल त्यांचे व्याही वामन चव्हाण, विहीणबाई प्रमिला चव्हाण आदी उपस्थित होते. घरात दु:खमय वातावरण असतानादेखील अहिरे परिवाराने केलेला हा सकारात्मक विचार समाजाला आदर्श देणारा ठरला आहे. सदर अभिनव उपक्रम राबविल्याने अहिरे परिवाराचे परिसरात कौतुक होत आहे.
दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश…
सध्या शहरासह ग्रामीण भागात देखील सर्वत्र सिमेंटचे जंगल तयार होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. अस्थीचे नदीत विसर्जन केल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. अस्थी बरोबर रक्षा पाण्यात विसर्जीत केल्याने रक्षा पाण्याच्या तळाला जाऊन पाणी जमिनीत मुरण्यासाठी अडथळा निर्माण होतो. शिवाय पाण्यातील जलचर, कृमी-किटकांनाही ते हानिकारक होते, त्या अनुषंगाने पारंपरिक रूढी परंपरेला फाटा देऊन अहिरे परिवाराने राबविलेला वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम समाजाला पथदर्शी ठरला असून, आगामी काळात अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी व अनुकरणीय ठरेल यात शंका नाही.
भरमसाठ होणाऱ्या वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होऊन दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खालावली जात आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी काहीसा हातभार लागावा, या अनुषंगाने पारंपरिक रूढी परंपरेला फाटा देऊन आमचे मोठे बंधू कै. सुरेश अहिरे यांच्या अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता शेतजमिनीत टाकून त्यावर वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव मोठा मुलगा प्रा. अमोल अहिरे याने मांडला असता, आमच्या समस्त अहिरे परिवाराने त्यास एकमुखाने संमती दर्शविली व वृक्षारोपण करण्यात आले. यातून त्यांच्या आत्मास देखील शांती लाभेल. बाळासाहेब अहिरे, दाभाडी.