अडीच वर्षांत मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून स्वत:कडे घेतला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढाओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला आहे.
सत्तास्थापनेच्या पहिल्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना एकनाथ शिंदे जरासे गांगरले. त्यावेळी त्यांचं उत्तर पूर्ण होण्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून माईक हिसकावून घेतला आणि हसत उत्तर दिलं. त्या पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं होतं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.
याच प्रसंगाचा संदर्भ देत अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्याला निमित्त ठरलं ते गुरुवारी झालेली शिंदे-फडणवीस यांची पत्रकार परिषद. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदर धनंजय महाडीक यांचं नाव विसरल्यावर फडणवीस यांनी त्यांना कागदावर लिहून त्याची आठवण करून दिली.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. त्याबद्दल बोलताना अजित पवारांनी म्हटलं, "शिंदे आणि फडणवीस हे दोन जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहे. सरकारकडे 165 आमदारांचं पाठबळ आहे. पण घोडं कुठे पेंड खात आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार करायला सरकार का घाबरतंय?"
सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील करात 50 टक्क्यांनी कपात करावी, अशी तेव्हा विरोधात असलेल्यांची मागणी होती. आता हीच मंडळी सत्तेत आहेत. मात्र त्यांनी इंधनावरील कर 50 टक्क्यांनी कमी केलेला नाही, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे सरकारच्या पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याच्या निर्णयावर टीका केली.