इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल -
इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली आहे. या निर्णयामुळे दहावीचा निकाल वेळेत लागण्यास मदत होणार आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा -
मुंबईच्या भौगोलिक परीस्थितीचा विचार करता बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा व नवी मुंबई आणि पनवेल अशा ठिकाणी राहतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या निर्णयामुळे दहावी मूल्यमापनाच्या प्रक्रियेत संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये लेवल २ किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येतील. हे रेल्वे पास ऑनलाईन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. यासाठीची लिंक देण्यात येईल. यासर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक हे काम पाहतील.