राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांना आज एका कार्यक्रमादरम्यान अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. त्यांच्यावर अकोल्यातील आयकॉन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान,आपल्या प्रकृतीबाबत स्वत: अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली असून येत्या दोन दिवसांत रुग्णालयातून सुट्टी मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांच्या उपस्थितीत बी फार्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. आमदार अमोल मिटकरी यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी भाषण संपवताना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी रचलेले एक गीत खड्या आवाजात सादर केले. त्यावेळी त्यांचा आवाज चिरका होत तोंड वाकडे होत असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. या नंतर मिटकरी यांना अचानक उच्च रक्तदाबचा त्रास जाणू लागला आणि त्यांची प्रकृती बिघडली.
मिटकरी यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन उपस्थितांनी तातडीने त्यांना अकोल्यातील आयकॉन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,आता अमोल मिटकरी यांनी स्वत: एक व्हिडीओ पोस्ट करत आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. सध्याचा कोव्हीड काळ लक्षात घेता कोणीही भेटण्यासाठी येवू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत आपल्याला सुट्टी मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.