अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याला देशभरातील प्रमुख साधू संतांना निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण अमरावतीच्या रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना देखील देण्यात आले आहे.
आता स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष निमंत्रण आले आहे. त्यामुळे विदर्भ पीठात आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी अयोध्येत जाण्यासाठीची तयारी देखील सुरु केली होती. मात्र, अचानक जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय लिहिले आहे पात्रात?
"आप जो अयोध्या.. अयोध्या कर रहे हो, वह आपको महंगा पडेगा. आज नही तो कल, कुछ दिनो मे आपका अंत निश्चित है....." असा आशयाचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. मात्र हे पत्र नेमके कुणी पाठवले? याबाबत त्या पत्रात उल्लेख केलेला नाही. याप्रकरणी महाराजांच्या अनुयायांनी कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
आम्ही सर्व पदाधिकारी अयोध्येत जाण्यासाठीच्या तयारीत होतो. अचानक एक पत्र आम्हाला आढळून आले. ज्यामध्ये स्वामीजींच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा आशय आहे. या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता आम्ही तत्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली आहे. त्यानंतर आम्ही एसपींना भेटलो असल्याचे महाराजांच्या अनुयायांनी सांगितले आहे.
दरम्यान या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता, जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराजांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळायला हवे, अशी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना विदर्भपीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी दिले आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor