माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आली आहे.यामुळे माजी गृहमंत्री देशमुख यांचा मुक्काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तुरुंगातच असणार आहे. देशमुख यांना सुमारे पाच महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सध्या ते मुंबईच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आर्थर रोड तुरुंगात कैदेत आहेत.देशमुख यांची सीबीआय कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी सीबीआय कडून करण्यात आली होती. विशेष सीबीआय कोर्टानं ही विनंती फेटाळली आणि देशमुख यांना आणखी 14 दिवसांची म्हणजे 29 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
ईडीने गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी लांबलचक चाललेल्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं होतं.
त्यांनी प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रींग कायद्यांअंतर्गत कलम 19 अन्वये अटक करण्यात आलेली आहे. अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचाही आरोप आहे.
सुरुवातीला विशेष न्यायालयाने ईडी कोठडीची मागणी फेटाळली होती. मुंबई हायकोर्टाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करत अनिल देशमुखांची ईडी कोठडी कायम केली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून अनिल देशमुख यांच्या कोठडीत अनेकवेळा वाढ करण्यात आली. दरम्यान सचिन वाझे, संजीव पांडे आणि कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत देखील वाढ करण्यात आली आहे.