राजापूर-ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावर अणुस्कुरा घाटात रविवारी पहाटे पुन्हा दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास ठप्प झाली होती. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांच्या कार्यतत्परतेमुळे तात्काळ रस्त्यावरील दरड हटवून 2 तासाने सर्व वाहतूक सुरू केली आहे. या मार्गावर गुरूवारी ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळली.
तालुक्यात गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारा ओणी पाचल अणुस्कुरा कोल्हापूर हा नजीकचा मार्ग आहे. या मार्गावर राजापूर तालुक्यातील येरडव पासून सुमारे 8 किमी रस्ता घाटातून जातो. या मार्गावर अणुस्कुरा घाटात शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेच्या दरम्यान गुरूवारी ज्या ठिकाणी दरड पडली होती तिथेच पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्वच वाहतूक सुमारे 2 तास बंद झाली होती. याबाबतची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्ग सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले.
घाटात दरड कोसळल्याने पश्चिम महाराष्ट्राकडे या मार्गाने जाणारी सर्वच वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. दोन तासांनतर दुचाकी व एकेरी वाहतुक सुरू केली. सुमारे पाच तासांनतर सर्व वाहतुक सुरळीत सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील हा पूर्ण अडथळा दोन तासातच दूर करण्यात आला आणि वाहतूक तात्काळ सुरू करण्यात आली. यामुळे पाच तासातच हा अणुस्कुरा घाट मोकळा झाला आणि वाहन चालकांची गैरसोय दूर झाली.