Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तार‍िकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२ कोटी रूपयांच्या रकमेस शक्ती प्रदत्त समितीची मान्यता

airport
, मंगळवार, 19 एप्रिल 2022 (08:06 IST)
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्वपूर्ण असून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी रूपये २१२.२५ कोटी इतक्या निधीसाठी मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या (High Power Committee) बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
 
श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा विकासाभिमुख जिल्हा असून पर्यटन, उद्योग, शिक्षण, संस्कृती, कला, तंत्रज्ञान आणि कृषी अशा अनेकविध क्षेत्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. या सर्व क्षेत्रातील कोल्हापूरचे महत्त्व हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून या आज झालेल्या बैठकीत अधोरेखित करण्यात आले आहे.
 
कोल्हापूर विमानतळ हे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली येत असून या विमानतळावरून उडान योजनेंतर्गत हवाई वाहतूक केली जात आहे. तथापि, कोल्हापूर विमानतळ हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी विमानतळाचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यासाठी २५.९१ हेक्टर आर क्षेत्र जमीनीचे संपादन करणे जरुरीचे असून यासाठी निधीची आवश्यकता होती. आज झालेल्या बैठकीत भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या २१२ कोटी रूपयांच्या मान्यता देण्याचा निर्णय समितीने घेतला असून ही निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब असल्याची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
 
श्री.पाटील म्हणाले, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रूपये एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपये इतका निधी दिनांक २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरीत करण्यात आलेला आहे. विस्तारीकणाच्या पुढील निधीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी रुपये २१२.२५ कोटी एवढ्या रकमेचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता. तथापि या प्रस्तावाला शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीची मान्यता आवश्यक असते. या समितीचे अध्यक्ष हे मुख्य सचिव असून या समितीचे अन्य सदस्य हे वित्त, नियोजन, उद्योग, गृह व सामान्य प्रशासन या विभागाचे सचिव आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी हे आहेत. या समितीने आज झालेल्या बैठकीत माझ्या मागणीचा सकारात्मक विचार करीत विमानतळाच्या विस्तारीकणा साठी २१२ कोटी रूपयांस मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
 
श्री. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार असून राज्याच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो.
 
आज झालेल्या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख; सलग दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती लष्कर प्रमुख पदी